
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेनेच्या प्रकरणासारखाच निर्णय दिला. राष्ट्रवादी कुणाची हे ठरवताना विधिमंडळ पक्षाचे बहुमत हाच एकमेव निकष असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४१ आमदारांचा पाठिंबा अजित पवार गटाला असल्यामुळे अजित पवारांचा गट हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. अजित पवार गटाचे आमदार अपात्र ठरवण्याची शरद पवारांची याचिका फेटाळून लावली. परिणामी अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरले आहेत. दुसरीकडे शरद पवार गटाचेही आमदार पात्र ठरवले आहेत.
पक्षघटना, नेतृत्वरचना आणि विधिमंडळ संख्याबळ या आधारावर हा निर्णय घेतल्याचे नार्वेकर म्हणाले. पक्षाची नेतृत्व संरचना किंवा पक्ष संघटनेवरून कोणता गट पक्ष आहे, हे निश्चित होत नाही. त्यामुळे विधिमंडळ संख्याबळाच्या आधारावर अजित पवारांचा गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याच्या निकर्षाप्रत मी पोहोचलो, असे नार्वेकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडली नाही. तर दोन गट तयार झालेले आहेत.शरद पवारांच्या मनाविरोधात जाणे म्हणजे पक्ष सोडणे नव्हे. पक्षात मतभेद असतात. पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधिमंडळ पक्षात नाराजी असू शकत नाही. पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नव्हे. असे सांगतानाच पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही, असे नार्वेकर म्हणाले.