छत्रपती संभाजीनगरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात श्रीरामनवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला दिलेली परवानगी विद्यापीठ प्रशासनाने अखेर मागे घेतली आहे. धार्मिक कार्यक्रम आयोजित करून विद्यापीठ परिसराचा धर्मांध राजकारणाचा अड्डा बनवण्याची परवानगी देण्यास पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी संघटितपणे विरोध केल्यानंतर अखेर विद्यापीठ प्रशासनाला उपरती झाली आणि या कार्यक्रमाला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. मात्र मागचापुढचा कोणताही विचार न करता या कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र प्रशासनाने मोकळे सोडले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात ३० मार्च रोजी श्रीरामनवमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रीरामनवमीनिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ऋषी देवव्रतजी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून मर्यादा पुरूषोत्तम राम आणि जीवन जगण्याची कला असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरात धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल करत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. पुरोगामी चळवळीच्या संघटित शक्तीपुढे विद्यापीठ प्रशासनाने नमते घेत या कार्यक्रमाला दिलेली परवानगी अखेर रद्द केली आहे.
आयोजकांनी सांगितला एक, ठेवला दुसराच कार्यक्रम?
विद्यापीठाच्या नाट्यगृहाचे बुकिंग करताना आयोजकांनी आपण श्रीरामनवमीनिमित्त कार्यक्रम घेत असल्याचे सांगितलेच नाही. दुसऱ्याच कार्यक्रमाचे नाव सांगून विद्यापीठाचे नाट्यगृह बुक करून घेतले आणि नंतर श्रीरामनवमीनिमित्त कार्यक्रम आयोजित केल्याची निमंत्रणपत्रिका प्रकाशित केली, असे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले. आरएसएसने असाच एक कार्यक्रम विद्यापीठ परिसरात घेतला होता. त्याही वेळी विद्यापीठ प्रशासनाने असेच कारण देऊन वेळ मारून नेली होती. त्या कार्यक्रमाची परवानगी देणाऱ्यावर कोणतीही कारवाई केलेली नव्हती.
परवानगी देणारा अधिकारी मात्र मोकळाच
विद्यापीठाचे नाट्यगृह व्यावसायिक भाडेतत्वावर देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला असला तरी हे नाट्यगृह नेमके कोणत्या कार्यक्रमांसाठी भाड्याने द्यायचे, याबाबतची कोणतीही नियमावली निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुणीही काहीही कारणे सांगून नाट्यगृहाचे बुकिंग करू शकतो आणि शुल्क अदा करून नाट्यगृह ताब्यात घेऊ शकतो, अशीच एकंदर परिस्थिती आहे. श्रीरामनवमीच्या कार्यक्रमाचे आयोजक जेव्हा नाट्यगृहाच्या बुकिंगसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या उपकुलसचिवांकडे गेले, तेव्हा त्यांनी कोणतीही खातरजमा न करता नाट्यगृहाचे बुकिंग करून घेतले.
त्यानंतर आयोजकांनी निमंत्रणपत्रिका छापल्यानंतर वाद निर्माण झाला आणि विद्यापीठ प्रशासनाने परवानगी रद्द केली. परंतु कोणतीही खातरजमा न करताच परवानगी का दिली? ती देणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे भविष्यात असे बुकिंग होणारच नाही आणि वाद निर्माण होणार नाही, याची काहीच शाश्वती नाही.
आयोजकांऐवजी कुलसचिवांनी गृह व्यवस्थापकाला दिले पत्र
विद्यापीठ प्रशासनाने पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या दबावापुढे हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. नियमाप्रमाणे ज्यांच्याकडून शुल्क भरून घेऊन नाट्यगृहाचे बुकिंग करून घेतले त्यांना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी नियमाप्रमाणे पत्र देणे अनिवार्य होते. परंतु आयोजकांना कोणतेही पत्र न देता कुलसचिवांनी विद्यापीठाच्या गृह व्यवस्थापकाच्या नावाने पत्र काढले आणि हा कार्यक्रम रद्द केल्याचे कळवले.
उद्या नियोजित वेळी कार्यक्रमाचे आयोजक नाट्यगृहाच्या बुकिंगची पावती दाखवत नाट्यगृह उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर आडून बसले तर विद्यापीठ प्रशासन काय करणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाला विरोध करणाऱ्यांना अंधारात ठेवून नियोजित कार्यक्रम पुढे रेटण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा प्रयत्न तर नाही ना? अशी शंका घेतली जाऊ लागली आहे.