अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के, मदतनीसांच्या मानधनात १० टक्के वाढ; रिक्त पदेही भरणार


मुंबईः अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून आज विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के तर मदतनीसांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्यात आल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. ही मानधन वाढ कमी आहे. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यात सरकार कमी पडत आहे, असा आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेतून सभात्याग केला.

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार, आदिती तटकरे, कुणाल पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अंगणवाडी सेविकांच्या विविध समस्यांवरून सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, अंगणवाडीची वीज देयके सरकारने दिलेली नाहीत, ती देण्यात यावीत, असे अजित पवार म्हणाले. अंगणवाडी आणि अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्याबाबत सरकार उदसीन असून अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी आग्रही मागणी आ. आदिती तटकरे यांनी लावून धरली.

अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल बंद आहेत. ते सुरू करण्यात यावेत आणि या मोबाईलव्दारे भरले जाणारे अर्ज इंग्रजीऐवजी मराठीतून असावेत, अशी मागणीही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लावून धरली.

राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत नुकतीच एक बैठक घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे, असे लोढा यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

अंगणवाडी सेविकांसाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अंगणवाड्यांच्यी वीज देयके देण्यासाठी १५ कोटींची तरदूत करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाइल पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. या मोबाईलद्वारे जे अर्ज भरण्यात येतील, ते मराठीतून असावेत, यासाठी केंद्र सरकारला विनंती करणार असल्याचे लोढा म्हणाले.

 लोढा यांच्या उत्तराने विरोधी पक्षाच्या सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्याबाबत सरकार उदासीन आहे. हे प्रश्न सोडवण्यात सरकार कमी पडत आहे, असा आरोप विरोधकांनी केला.

रिक्त पदे भरणारः अंगणवाड्यांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नवीन मोबाईल खरेदीही करण्यात येत आहे. या मोबाईल ॲप मध्ये ‘ट्रॅक ॲप’ आहे त्यामध्ये माहिती अद्ययावत करत असताना नाव इंग्रजीत भरले असले, तरीही उर्वरित सर्व माहिती मराठीमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही लोढा यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!