भाजपने महाराष्ट्रातील उद्योगांपाठोपाठ सहावे ज्योतिर्लिंगही पळवले? आसाम सरकारच्या जाहिरातीवरून वाद उफाळला!


मुंबई/गुवाहटीः महाराष्ट्रातील उद्योग भाजपकडून अन्य भाजपशासित राज्यात पळवण्यात येत असल्याचा आरोप होत असतानाच आता महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसाही पळवण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्रातील सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ख्याती असलेले पुण्यातील भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग खरे नसून खरे सहावे ज्योतिर्लिंग आसामच्या कामरूपमधील डाकीनी हिल्समध्ये असल्याचा दावा करणारी जाहिरात आसाम सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील असून त्यापैकी सहावे ज्योतिर्लिंग  पुण्यातील शीमाशंकर येथे आहे. देशभरातील लाखो शिवभक्त येथे भगवान शंकराच्या दर्शनासाठी येतात. परंतु आता हेच सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ख्याती असलेले भीमाशंकर खरे ज्योतिर्लिंग नसल्याचा दावा आसाम सरकारने केला आहे. खरे सहावे ज्योतिर्लिंग आसामच्या कामरूपमधील डाकीनी हिल्समध्ये असल्याचा दावा करणारी भली मोठी जाहिरातच आसाम सरकारने अधिकृतरित्या प्रसिद्ध केली आहे.

 आसाम सरकारच्या या जाहिरातीत १२ ज्योतिर्लिंगांची यादीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात शीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग डाकीनीमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबरच भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग डाकीनीमध्येच असल्याचा दावा करणारी एक अख्यायिकाही या जाहिरातीत सांगण्यात आली आहे.

ही अख्यायिका शिवपुराणातील जननसंहितेतील ४८ व्या भागातील असल्याचा दावाही या जाहिरातीत करण्यात आला असून या संहितेत भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग डाकीनीमध्ये असल्याचा उल्लेख असल्याचे या जाहिरातीत म्हटले आहे. वस्तुतः शिवपुराणात सातच संहिता असून विद्येश्वर संहिता, रूद्र संहिता, शतरूद्र संहिता, कोटिरूद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीय संहिता या संहितांचा समावेश आहे.

डाकीनी येथे येत्या १८ फेब्रुवारीला महाशिवरात्री धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार असून आसामच्या पर्यटन मंत्रालयाने त्याची जोरात तयारीही केली आहे. आसामचे भाजपचे मुख्यमंत्री डॉ. हेमंत बिस्वा सर्मा यांच्या छायाचित्रासह ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्या’ बदल्यात ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?-खा. सुळेः आसाम सरकारच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आसाम सरकारच्या या दाव्यावर संताप व्यक्त करत भाजपला ठणकावले आहे. ‘भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचे नाही, असे ठरवले काय?  अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळवले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातलाय…!’,  असे खा. सुळे यांनी ट्विट करून म्हटले आहे.

श्री शिवशंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील भीमाशंकर (पुणे) हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते. अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पण भाजपची सत्ता असणाऱ्या आसाम सरकारने गुवाहटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरू केला आहे, असेही सुळे यांनी म्हटले आहे.

घटनाबाह्य ईडी सरकार आपण गुवाहटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. तेथे तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना? अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

खा. सुळे यांनी पुण्यातील भीमाशंकर हेच सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा पुरावाही आपल्या ट्विटमध्ये दिला आहे. श्रीमद आद्य शंकाराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्रोतामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकीनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही, असे खा. सुळे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपण्यासाठी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर तमाम भारतीयांचा अपमान-काँग्रेसः केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपच्या आसाम सरकारचा दावा आहे की, भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो, असे काँग्रेस नेत सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

शिंदे- फडणवीस सरकारने तत्काळ भूमिका स्पष्ट करून आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे. भाजपने केवळ महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्याच नव्हे तर तमाम भारतीयांच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत आहे, अशी टीकाही सावंत यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!