नवी दिल्लीः ‘लोकसभा निवडणुकीत जर एनडीएला ४०० जागा मिळाल्या तर संविधान बदलू’ असे वादग्रस्त विधान करणारे कर्नाटकचे दिग्गज नेते आणि तब्बल सहा वेळा खासदार राहिलेले अनंतकुमार हेगडे यांचे भाजपने तिकिट कापले आहे. १० मार्च रोजी हेगडे यांनी हे विधान केले होते. त्यामुळे विरोधकांनी भाजपवर टिकास्त्र सोडले होते. या वादग्रस्त विधानामुळेच भाजपने त्यांचे तिकिट कापल्याचे मानले जात आहे.
संविधान बदलण्याबाबत अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या विधानामुळे मोठे वादंग उठले होते. विरोधी पक्षांनी हाच मोठा मुद्दा करत भाजपला घेरले होते. विरोधकांकडून टिकेची झोड उठवण्यात आल्यानंतर भाजपने हेगडे यांच्या या विधानाशी असहमती दर्शवत अंग झटकले होते.
अनंतकुमार हेगडे हे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष आणि केंद्रात कॅबिनेट मंत्रीही राहिलेले आहेत. पक्षामध्ये अनुशासन सर्वांसाठी सारखेच आहे आणि गैरवाजवी विधाने केल्यास पक्ष ते खपवून घेणार नाही, असा संदेशच भाजपने आपल्या या दिग्गज नेत्याचे तिकिट कापून देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. हेगडे यांच्याऐवजी विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते सहावेळा आमदार आणि कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहे.
१० मार्च रोजी अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले होते की, एनडीएसाठी दोन्ही सभागृहात ४०० पेक्षा जास्त जागा मिळवणे आवश्यक आहे. तसे झाले तरच आम्ही संविधानामध्ये आवश्यक त्या दुरूस्त्या करण्यास सक्षम असू.
हिंदू धर्मावर अत्याचार करण्यासाठी आधी आमच्या काही अनावश्यक दुरूस्त्या करून संविधान मौलिकदृष्ट्या बदलण्यात आले आहे. जर एनडीएला ४०० जागा मिळाल्या तर संविधानामध्ये बदल केले जाऊ शकतात, असेही हेडगे यांनी काँग्रेसवर टिकास्त्र सोडताना म्हटले होते.
हेगडे यांच्या या विधानानंतर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी हाच मोठा मुद्दा केला होता. ‘भाजप खासदाराचे विधान त्यांना ४०० जागा संविधान बदलण्यासाठी पव्या आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांचा संघ परिवाराचे छुपे मनसुब्यांची सार्वजनिक घोषणा आहे,’ असे टिकास्त्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोडले होते.
बाबासाहेबांचे संविधान संपुष्टात आणणे हेच नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम लक्ष आहे. त्यांना न्याय, समानता, नागरी हक्क आणि लोकशाहीविषयी द्वेष आहे. आम्ही स्वातंत्र्य लढ्याच्या नायकांच्या स्वप्नांशी रचलेले हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाने मिळालेल्या लोकशाही अधिकारांची लढाई लढत राहू, असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, ही धास्ती भाजपला वाटल्यामुळे अनंतकुमार हेगडे यांचे तिकिटच भाजपने कापले, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अनंतकुमार हेगडे यांचे तिकिट कापण्यात आले असले तरी विरोधक लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही हा मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे.
हेगडे यांच्या आधी भाजपने साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी, परवेश साहीबसिंग वर्मा या विद्यमान खासदारांची तिकिटे कापली होती. या खासदारांनीही वादग्रस्त विधाने करून भाजपला अडचणीत आणले होते. भाजपचा हा निर्णय जबाबदार आणि रचनात्मक विधाने करणाऱ्या आणि विभाजनवादी विधाने न करता पक्षाची मूल्ये आणि सिद्धांतानुसार काम करणाऱ्या नेत्यांनाच प्रोत्साहन देण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल मानले जात आहे.