ठाकरे गटाला २६ फेब्रुवारीपर्यंतच वापरता येणार पक्षाचे नाव आणि मशाल चिन्ह; नंतर घ्यावे लागेल नवे नाव, नवे चिन्ह!


नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे त्या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल आहेच. परंतु उद्धव ठाकरे यांच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाला दिलेले ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह केवळ कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलेल्या आदेशातच तसे नमूद केले आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर ठाकरे गटाला नवे नाव आणि नव्या चिन्हाचा शोध घ्यावा लागणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधिमंडळ आणि संसदेतील बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देऊन टाकले आहे. अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेले ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. याच निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलेले मशाल हे चिन्ह कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे.

 उद्धव ठाकरे गटाला २६ फेब्रुवारीपर्यंत मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरण्याची परवानगी असेल. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आणि मशाल हे चिन्ह वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयात स्पष्ट केले आहे.

कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपला उमेदवार दिलेला नाही. महाविकास आघाडीतर्फे कसबापेठमधून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर तर चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हाचा अधिकृत वापर होणार नाही. मात्र या निवडणुकीनंतर म्हणजेच २६ फेब्रुवारीनंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह वापरता येणार नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाकडे कोणतेही निवडणूक चिन्ह असणार नाही.

हेही वाचाः ठाकरेंची ‘शिवसेना’ एकनाथ शिंदेंच्या ओटीत, ‘धनुष्यबाण’ चिन्हाचेही निवडणूक आयोगाकडून ‘दान’

कसबापेठ आणि चिंचवड निवडणुकीपुरतेच मशाल हे चिन्ह वापरण्यास निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला परवानगी दिली आणि त्यानंतर हे चिन्ह वापरता येणार नाही, असे स्पष्ट केले असले तरी उद्धव ठाकरे गट नव्याने निवडणूक आयोगाकडे मशाल या चिन्हावर दावा करू शकतो.

परंतु ठाकरे गटाकडून असा दावा केला जाण्याच्या आधीच समता पार्टीने मशाल या चिन्हावर दावा केला आहे. तसे पत्रच त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिले असून मशाल हे चिन्ह समता पार्टीचे असून समता पार्टीसाठीच ते राखून ठेवण्यात यावे, असे समता पार्टीने म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता मशाल चिन्हाबाबत नेमका काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली आणि भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक आयोगाकडे दावा दाखल केला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव व ढाल तलवार हे चिन्ह तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले होते.

 आता निवडणूक आयोगाने या वादावर शुक्रवारी अंतिम निकाल देऊन शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केले तर २६ फेब्रुवारीनंतर मशाल हे चिन्ह आणि पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली तर परिस्थिती जैसे थे राहील. परंतु न्यायालयाने स्थगितीस नकार दिला तर मात्र उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडे नवे नाव आणि नवे चिन्ह मागण्याशिवाय अन्य पर्याय उरणार नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!