विद्यापीठ प्रशासनाची दिशाभूल करून सिल्लोड शिक्षण संस्थेच्या राहुल म्हस्केंनी मिळवल्या दोन स्वतंत्र महाविद्यालयात पूर्णवेळ मान्यता!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची दिशाभूल करून सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव राहुल म्हस्के यांनी आपल्याच संस्थेच्या एका महाविद्यालयात सहायक प्राध्यापक तर दुसऱ्या महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून पूर्णवेळ मान्यता मिळवली असल्याचे धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत. विशेष म्हणजे ही एकच व्यक्ती या दोन्ही ठिकाणी अद्यापही पूर्णवेळ कार्यरत आहे.

‘थोर शिक्षण महर्षि जनार्दन म्हस्के यांनी स्थापन केलेल्या ’सिल्लोड शिक्षण संस्थेचे राहुल म्हस्के हे सचिव आहेत. या संस्थेला बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक शिक्षण संस्थेचा दर्जा आहे. या शिक्षण संस्थेच्या वतीने जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथे सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालय चालवले जाते. ज्याची संस्था त्यानेच त्या संस्थेत नोकरी करणे हे अनैतिक असले तरी राहुल म्हस्के हे या दोन्ही महाविद्यालयात एकेठिकाणी प्रभारी प्राचार्य तर एके ठिकाणी सहायक प्राध्यापकपदावर पूर्णवेळ कार्यरत आहेत.

‘सिद्धार्थ’मध्ये सहायक प्राध्यापक

सिल्लोड शिक्षण संस्थेने १९९१ मध्ये जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथे सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयात २००४ मध्ये संगणकशास्त्र विभाग सुरू करण्यात आला आणि या विभागाअंतर्गत बी.एस्सी. संगणकशास्त्र या पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. एम.एस्सी., एम.फिल. या शैक्षणिक अर्हतेच्या आधारे राहुल जनार्दन म्हस्के यांची या विभागात सहायक प्राध्यापकपदावर पूर्णवेळ नियुक्ती दाखवण्यात आली आणि या नियुक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून मान्यता घेण्यात आली आहे.

जाफ्राबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या रेकॉर्डला राहुल म्हस्के हे संगणकशास्त्र विभागात पूर्णवेळ सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

‘नसलेल्या’ अध्यापकावर विभाग कसा चालतो?

विशेष म्हणजे राहुल म्हस्के हे या महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख आहेत. त्यांच्याशिवाय या विभागात एकाही पूर्णवेळ अध्यापकाची नियुक्ती नाही. डी.ए. वाघ या व्यक्तीची प्रयोगशाळा अटेंडन्ट म्हणून नियुक्ती दाखवण्यात आली आहे. सिद्धार्थ महाविद्यालयाच्या रेकॉर्डनुसार राहुल म्हस्के हे अद्यापही या महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आणि विभागप्रमुखपदावर कार्यरत आहेत. एकाच पूर्णवेळ अध्यापकाच्या नियुक्तीवर एखादा पदवी अभ्यासक्रम कसा चालतो? आणि एकच अध्यापक बी.एस्ससी. संगणकशास्त्रासारखा तांत्रिक अभ्यासक्रम कसा काय शिकवतो? हा स्वतंत्र  अभ्यासाचा विषय आहे.

‘नालंदा’मध्येही पूर्णवेळ कार्यरत

सिल्लोड शिक्षण संस्थेने सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालय सुरू केले. येथे बी.सी.ए. आणि बी.सी.एस. हे अभ्यासक्रम चालवले जातात. जळगाव रोडवरील हडको एन-११ येथील नूतन बहुउद्देशीय विद्यालयाच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या या महाविद्यालयात राहुल म्हस्के हे १५ जून २०२० रोजी सहायक प्राध्यापक म्हणून रूजू झाल्याचे दाखवण्यात आले.

नालंदामध्ये मान्यता मिळवल्यानंतर म्हस्के यांना प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव २८ सप्टेंबर २०२० रोजी विद्यापीठाकडे पाठवण्यात आला आणि ७ ऑक्टोबर २०२० रोजी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने राहुल म्हस्के यांना नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालयात राहुल म्हस्के हे १५ जून २०२० रोजी रूजू झाले आणि त्यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यताही मिळवली.

आता कारवाईकडे लक्ष!

नियमाप्रमाणे एका व्यक्तीला एका वेळी कोणत्याही एकाच ठिकाणी पूर्णवेळ कर्तव्य पार पाडता येते. परंतु सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव राहुल म्हस्के यांनी विद्यापीठाची दिशाभूल करून एकाच वेळी दोन स्वतंत्र महाविद्यालयात कार्यरत असल्याची पूर्णवेळ मान्यता मिळवण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासन राहुल म्हस्के यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार का? सिल्लोड शिक्षण संस्थेने जी दिशाभूल केली, त्याबद्दल या संस्थेविरुद्धही कारवाई करणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!