विद्यापीठातील नवीन गेटचे सर्व बांधकाम उद्धवस्त, नव्या वादाच्या ‘मगर’मिठीतून कुलगुरूंनी करून घेतली सुटका!


औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अवघ्या दहा-पंधरा फूट अंतरावर बांधण्यात आलेले नवीन गेटचे सर्वच्या सर्व बांधकाम अखेर उद्धवस्त करण्यात आले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवसांत हे बांधकाम पाडून टाकण्याचे आश्वासन आंबेडकरी चळवळीच्या शिष्टमंडळाला दिले होते. अखेर उशिराने का होईना, पण कुलगुरू डॉ. येवले यांनी दिलेला शब्द पाळला आणि नवीन गेटच्या  वादाच्या ‘मगर’मिठीतून स्वतःची सुटका करून घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे काम विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीच अगदी दहा-पंधरा फुटांच्या अंतरावर ‘इन-आऊट गेट’च्या नावाखाली नवीन गेट बांधण्यात  आले होते.

विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार हे नामांतर चळवळीचे प्रतिक तसेच आंबेडकरी जनतेची अस्मिता आणि प्रेरणास्रोत बनले आहे. त्यामुळे या मुख्य प्रवेशद्वाराचे महत्व कमी करण्यासाठीच विद्यापीठ प्रशासनाकडून नवीन प्रवेशद्वार बांधण्यात येत आहे, असा आंबेडकरी नेते आणि कार्यकर्त्यांचा आक्षेप घेतला होता. आंबेडकरी जनतेच्या भावना आणि हे सर्व आक्षेप धुडकावून विद्यापीठ प्रशासन या नवीन गेटचे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न करत होते.

आवश्य वाचाः विद्यापीठाच्या नवीन गेटच्या वादात ‘दिव्य’ मांडवलीचा पर्दाफाश; ना स्ट्रक्चरल ऑडिट, ना तज्ज्ञांची शिफारस, हे घ्या पुरावे

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाला आमचा विरोध नाही, परंतु सुशोभीकरणाच्या नावाखाली नवीन गेट बांधण्याचे कटकारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन दिला होता.  त्यावेळी कुलगुरूंनी आंबेडकरी जनतेची इच्छा नसेल तर नवीन गेट बांधणार नाही, असे आश्वासन दिले होते खरे, पण या नवीन गेटच्या बांधकामाला स्वार्थाची ‘मगर’मिठी पडली आणि जणू काही आम्हीच आंबेडकरी जनतेचे कंत्राटदार आहोत अशी ‘शेखी’ मिरवणाऱ्यांनी या नवीन गेटच्या बांधकामासाठी कुलगुरूंची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन या नवीन गेटचे काम पुढे रेटत होते.

अखेर ७ डिसेंबर रोजी आंबेडकरी चळवळीच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन नवीन गेटचे झालेले बांधकाम तुम्ही पाडणार नसाल तर आम्ही स्वतः बुलडोजर लावून पाडू, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यावर तीन दिवसांत नवीन गेटचे बांधकाम काढून टाकण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले होते.

कुलगुरूंनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नवीन गेटचे बांधकाम पाडून टाकण्याचे काम ११ डिसेंबर रोजी सुरूही झाले होते. परंतु मधोमध उभारलेला एक बीम पाडून हे काम थांबवण्यात आले होते. या नवीन गेटसाठी उभारलेले दोन बीम तसेच उभे होते. हे पाहता केवळ मधला बीम काढून विद्यापीठ प्रशासन नवीन गेटचे बांधकाम करणार की काय? अशी शक्यता दिसू लागली होती. याकडे न्यूजटाऊनने लक्ष वेधले होते.

हेही वाचाः कुलगुरूंचे आश्वासन ठरले शुद्ध लोणकढी थाप, विद्यापीठाच्या नवीन गेटचे दोन बीम १८ दिवसांनंतरही तसेच उभे!

नवीन गेटचे दोन बीम तसेच उभे पाहून आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पुन्हा रेटा लावला आणि अखेर काल आणि आज असे दोन दिवस नवीन गेटचे सर्वच्या सर्व बांधकाम उद्धवस्त करण्यात आले आहे. उशिराने का होईना पण कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिलेला शब्द पाळून नवीन गेटच्या वादाच्या ‘मगर’मिठीतून स्वतःची सुटका करून घेतली. त्याबद्दल आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते त्यांना धन्यवाद देत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!