नवी दिल्लीः भारताच्या निवडणूक आयोगाने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मूळ शिवसेनेचे नाव बहाल केल्याचा निर्णय शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) दिला. त्याचबरोबर मूळ शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हही एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेला दिले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्याच राजकारणाला धक्का देणारा ठरणारा आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह पक्षाविरोधात बंडखोरी केली आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह ‘धन्युष्यबाणा’वरही दावा केला होता.
एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शुक्रवारी निर्णय दिला.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचे? याबाबत बाजू मांडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाला दिले होते. पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षातील अन्य महत्वाच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करण्यासही निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सांगितले होते. दोन्ही गटांनी संबंधित कागदपत्रे निवडणूक आयोगात सादर केली. त्यानंतर बहुमताच्या आधारावर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल करत असल्याचा निर्णय भारताच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाने राज्यभर जल्लोष केला आहे.
बेबंदशाही सुरू- उद्धव ठाकरेः निवडणूक आयोगाच्या या निकालावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय सुरूवात करायची आणि काय बोलायचे हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना ७५ वर्षांचे स्वातंत्र्य संपले, आम्ही बेबंदशाहीची सुरूवात केली आहे, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून करायला हरकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. चोराला राजमान्यता देणे हे भूषणावह वाटत असेल, परंतु चोर हा चोरच असतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या पद्धतीने शिवसेना मिंधे गटाला दिलेले आहे. त्यानुसार कदाचित येत्या महिना किंवा दोन महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे, असेही ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाचा निर्णय नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांना आधीच माहीत होता का? या मागे कट होता का? असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.
आत्मपरीक्षण करा-शिंदेः उद्धव ठाकरेंकडून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून त्यांना थांबण्याचा प्रयत्न आहे. आम्ही ५० आमदार चोर, १३ खासदार चोर, शेकडो-हजारो नगरसेवक चोर. म्हणजे तुम्ही लाखो लोकांना चोर ठरवत आहात. कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
सत्य आणि न्यायाचे धिंडवडे-राऊतः निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायाचे धिंडवडे काढले. चाळीस बाजार बुणगे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगतात आणि निवडणूक आयोग त्यास मान्यता देते. ही पटकथा आधीच लिहून तयार होती. देश हुकुमशाहीकडे निघाला आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल असे गद्दार सांगत होतेच. खोके चमत्कार झाला. लढत राहू, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
फारसा फरक पडत नाही म्हणत शरद पवारांनी काढून घेतली हवा
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसेल असे अंदाज वर्तवले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा फारसा फरक पडणार नाही, असे पवार म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचा निकाल दिला आहे. हा निकाल लागल्यावर त्यामध्ये चर्चा करता येत नाही. त्यामुळे जो निर्णय झाला आहे, तो स्वीकारून पुढे जायचे असते. पक्षचिन्ह गेल्याचा फारसा परिणाम होत नसतो. मला आठवतेय की काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि एका गटाचा वाद झाला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाची बैलजोडी ही निशाणी गेली होती. काँग्रेसने हात हे चिन्ह घेतले होते. लोकांनी त्या नव्या चिन्हाला मान्यता दिली. शिवसेनेबाबतही लोक नवे चिन्ह मान्य करतील. त्यामुळे धनुष्यबाण गेल्याने फारसा परिणाम होणार नाही, असे सांगत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आनंदोत्सवाची हवाच काढून घेतली आहे.