कॉपीमुक्ती अभियानः दहावी, बारावीच्या परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा केंद्रात प्रवेशावेळी घेणार अंगझडती

औरंगाबादः यंदाच्या माध्यमिक (दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात येत असून या दरम्यान शंभर टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रात प्रवेशावेळी झडती घेतली जाणार आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या प्रवेशबंदीमुळे बाहेरून विद्यार्थ्यांना रसद पुरवणे अवघड होणार आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून २१ मार्चपर्यंत चालणार आहे तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २ मार्चपासून सुरू होत असून २५ मार्चपर्यंत चालणार आहे. या कालावधीत परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय  यांनी दिले.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यादृष्टीने पूर्वतयारी आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय  यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे, शिक्षणाधिकारी देशमुख, पोलिस उपायुक्त अपर्णा गित्ते आदी उपस्थित होते.

कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी सर्व संबंधीत परीक्षा केंद्र संचालकांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. सीसीटीव्ही सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या-त्या परीक्षा केंद्रावर व्हायला हवा. परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आल्यावर अधिक आश्वासक वातावरण देण्याचा त्या-त्या परीक्षा केंद्राने प्रयत्न केला पाहिजे, असे जिल्हाधिकारी पांडेय यांनी सांगितले.

अशी असेल कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणीः

विद्यार्थी संख्याः  औरंगाबाद जिल्ह्यात इयत्ता १२ वीसाठी एकूण १५७ परीक्षा केंद्रावर ६०,४२५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर इयत्ता १० वीसाठी एकूण २२७ परीक्षा केंद्रावर ६४,९१९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

पालकांच्या बैठकाः सदर परीक्षेच्या पूर्वतयारी म्हणून शाळा स्तरावर पालकांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच संत एकनाथ रंगमंदिर येथे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र असलेल्या शाळांचे संस्थांचे प्रमुख/ प्रतिनिधी व केंद्रावरील केंद्र संचालक यांची संयुक्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पोलिस बंदोबस्तः परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनाधिकृत व्यक्तिांना प्रवेश नाही. परीक्षा केंद्रावर कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आलेल आहेत.

विद्यार्थ्यांची अंगझडतीः १०० टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती घेण्यात येणार आहे. पोलीस पाटील, कोतवाल व शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून मुलांची तपासणी व अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळेंच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी करण्यात येणार आहे.

बैठी पथकेः सर्व परीक्षा केंद्रावर बैठी पथके परीक्षेआधी एक तास ते परीक्षेनंतर एक तास (उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यंत) उपस्थित राहतील.

भरारी पथके: शिक्षण विभागाची ६ भरारी पथके परीक्षा केंद्राना भेटी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहेत. महसूल विभागाची १० पथके परीक्षा केंद्रावर भेटी देण्यासाठी स्थापन केलेली आहे.

जिल्हाधिकारी, सीईओंच्या भेटीः मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुका निहाय संपर्क अधिकारी म्हणून खाते प्रमुखांच्या नेमणुका केलेल्या आहेत. परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेटी देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!