आजपासून चार दिवस राज्यात गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट


मुंबईः  होळी आणि धुळवडीच्या तोंडावर झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असतानाच आज गुरूवारपासून पुढील चार दिवस राज्यात गारपीटीसह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. या काळात हवेचा वेगही जास्त राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मुंबई, पालघर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर अवकाळी पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यातील हो चार दिवस ढगांचा गडगडाट आणि गारपीटीसह पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

आज या चार जिल्ह्यांत अलर्टः हवामान खात्याने आज (१६ मार्च) राज्यातील पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या चार जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट दिला आहे. या चार जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबई, गडचिरोली, कोल्हापूर आणि नंदूरबार जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.

तापमानात दोन अंशांपर्यंत घटः सध्या हवामानात प्रचंड वेगाने बदल होत आहेत. एका ठिकाणी कडकडीत ऊन तर दुसऱ्या ठिकाणी ढगाळ वातावरण असे चित्र सध्या पहायला मिळत आहे. बदलत्या हवामानामुळे १६ मार्च ते १९ मार्च या चार दिवसांत दिवसभराच्या कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!