मुंबईः वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वन विभागात पैसे घेऊन तब्बल २०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप विरोधी पक्षाने नव्हे तर सत्ताधारी भाजपच्याच चार आमदारांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुधार मुनगंटीवार हे परदेश दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या खाथ्यात पैसे घेऊन बदल्या करण्यात आल्याचा आरोप आहे. वन विभागात ३१ मे २०२३ रोजी ३९ सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर १२ जणांना आहे त्याच जागेवर मुदवाढ देण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये अर्थकारण झाल्याची चर्चा थेट मंत्रालयातच होत आहे.
राज्यातील २०० पेक्षा जास्त वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या (आरएफओ) बदल्यांमध्येही गैरप्रकार झाले आहेत. आर्थिक देवाण घेवाण करून बदल्या करण्यात आल्या आहेत. भाजप आमदार हरिभाऊ बागडे, राम सातपुते, रणधीर सावरकर आणि आशिष जयस्वाल या चार आमदारांनी मुनगंटीवार यांना पत्र लिहून ही लेखी तक्रार केली आहे.
आमदारांच्या या आरोपांनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी या बदल्यांना स्थगिती दिली आहे. बदल्या झाल्यानंतर त्यांना स्थगिती देण्याचा प्रकार वन विभागात पहिल्यांदाच घडत आहे. या बदल्यांमध्ये अनियमितता कुठे झाली, याचीही आता चौकशी केली जाणार आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी या बदल्यांतील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावर भाष्य केले आहे. माझ्या अनुपस्थितीत बदल्या झालेल्या नाहीत. बदल्यासंदर्भात जे अधिकार आहेत ते मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तरीही मी आमदारांच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश दिले आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही तुमच्या स्तरावर पारदर्शक पद्धतीने बदल्या करा, असे आदेश मी वन विभागाला दिले होते. आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा नव्हती. यामध्ये काही आमदारांनी अधिकाऱ्यांविषयी गंभीर तक्रारी केल्या आहेत. म्हणून मी चौकशीचे आदेश दिले आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.