SSC Result 2023: इयत्ता दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के


पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावी म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (एसएससी) निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत ९३.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९२.०५ टक्के लागला आहे.

या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळातून १५ लाख ४९ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे हे प्रमाण ९३. ८३ टक्के इतके आहे.

इयत्ता बारावीप्रमाणेच इयत्ता दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०५ टक्के आहे. म्हणजेच मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.८२ टक्क्यांनी जास्त आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २ मार्च ते २५ मार्चदरम्यान इयत्ता दहावीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालाचा टक्का घसरला आहे. गेल्या वर्षी राज्याचा निकाल ९६.९४ टक्के होता. यंदाचा निकाल ९३.८० टक्के इतका आहे.

 या परीक्षेत ५ लाख २६ हजार २१० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ लाख ३४ हजार १५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर ८५ हजार २१८ विद्यार्थी उत्तीर्ण आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका १४ जून रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या शाळेत मिळणार आहेत. शाळांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळांवर एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

विभागीय मंडळनिहाय निकाल असाः कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के, कोल्हापूर ९६.७३ टक्के, पुणे ९५.६४ टक्के, मुंबई ९३.६६ टक्के, औरंगाबाद ९३.२३ टक्के, अमरावती ९३.२२ टक्के, लातूर ९२.७६ टक्के, नाशिक ९२.२२ टक्के, नागपूर ९२.०५ टक्के.

 कुठे पहाल निकाल?

विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल.

www.maharesult.nic.in

https://sscresult.mkcl.org

https://ssc.maharesults.org.in

कसा पहाल निकाल?

 वर दिलेल्या कोणत्याही एका संकेतस्थळाला भेट द्या. तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा. सबमिट हे बटन क्लिक करा. तुमचा दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!