राज्यातील २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे मराठी भाषा विभागाचे नवे सचिव, सुजाता सौनिक नव्या गृह सचिव


मुंबईः शिंदे- फडणवीस सरकारने राज्यातील तब्बल २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी त्वरित आपला नवीन पदभार स्वीकारावा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत.

१९८७ च्या बॅचच्या आएएस अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मंत्रालयातील गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. या पदावर दिनेश वाघमारे कार्यरत होते.

 सध्या एमएमआरडीएमध्ये कार्यरत असलेले १९९१ च्या बॅचचे सनदी अधिकारी एस.व्ही. आर. श्रीनिवास यांची धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई येथे विशेष कार्यअधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

 तुकाराम मुंढे (आयएएस २००५) यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. अंशु सिन्हा (आयएएस १९९९) यांची बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

सध्या बेस्टमध्ये कार्यरत असलेले १९९३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी लोकेश चंद्र यांची महाडिस्कॉम, मुंबई येथे मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी राधिका रस्तोगी यांची मंत्रालयातील नियोजन विभागात बदली करण्यात आली आहे.

१९९६ च्या बॅचच्या सनदी अधिकारी आय.ए. कुंदन यांची मंत्रालयातील महिला व बालकल्याण विभागातून मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

सध्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात कार्यरत असलेले १९९६ च्या बॅचचे अधिकारी संजीव जयस्वाल यांची म्हाडा, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे.

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आणि २००८ च्या बॅचचे सनदी अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  कोल्हापूरच्या आयुक्त कादंबरी बलकवडे आयएएस २०१०) यांची ऊर्जा विभागा अभिकरणाच्या महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.

 प्रदीपकुमार डांगे (आयएएस २०११) यांची संचालक, रेशीम, नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. शंतनू गोयल यांची (आयएएस २०१२) यांची सिडको, नवी मुंबईच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. (आयएएस २०१४) यांची संचालक, माहिती तंत्रज्ञा, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. डॉ. हेमंत वसेकर (आयएएस २०१५) यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.

डॉ. सुधाकर शिंदे (आयआरएस १९९७) यांची अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे बदली करण्यात आली आहे. डॉ. माणिक गुरसाल (आयएएस २००९) यांची अतिरिक्त विकास आयुक्तपदावरून (उद्योग) मुख्य कार्यकारी अधिकारी मेरिटाईम बोर्ड, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

अनुप कृ. यादव (आयएएस २००२) यांची अल्पसंख्याक विभागाच्या सचिवपदावरून महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची जलजीवन मिशनच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

आशीष शर्मा यांची मुंबई महानगर पालिकेतून नगरविकास विभागात बदली करण्यात आली आहे. महाडिस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची बेस्टचे जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!