मुंबई: मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, महिला, बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना राबवण्यात येत असून यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ज्यू समाजातील पात्र उमेदवारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख यांनी केले आहे. महामंडळामार्फत २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महामंडळ हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम यांची राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. निगममार्फत कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना यांची अंमलबजावणी महामंडळामार्फत राज्यात करण्यात येते. या योजनांमध्ये लाभार्थ्याच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेच्या आधारे काही सुधारणा करण्यात आल्या असून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनाअंतर्गत अर्ज स्वीकारण्यासाठी ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंती दिनापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. योजनांचे अर्ज महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे पत्ते व संपर्क क्रमांक देखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये देशातील शिक्षणासाठी २० लाख रुपयांपर्यंत तर परदेशातील शिक्षणासाठी ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी क्रेडिट लाईन १ अंतर्गत शहरी भागातील ज्या लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी व ग्रामीण भागातील ज्या लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ९८ हजार पेक्षा कमी आहे त्याला फक्त ३ टक्के वार्षिक व्याजदराने हे कर्ज देण्यात येते. तसेच क्रेडिट लाईन २ अंतर्गत ज्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत आहे त्यांच्यासाठी पुरुष लाभार्थीकरिता ८ टक्के तर महिला लाभार्थीकरिता ५ टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.
बेरोजगार उमेदवारांना व्यवसाय सुरु करण्यासाठीही २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. यासाठी क्रेडिट लाईन १ मधील लाभार्थींना २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असून ६ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असा ८ टक्के वार्षिक व्याजदर आहे. तसेच क्रेडिट लाईन २ मध्ये ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असून यातील पात्र पुरुष लाभार्थीकरिता ८ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असे १० टक्के वार्षिक व्याजदर तर महिला लाभार्थीकरिता ६ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असे ८ टक्के वार्षिक व्याजदर आहे.
महिला गटांसाठी सूक्ष्म परपुरवठा योजनाः अल्पसंख्याक महिला बचतगटांसाठी सूक्ष्म पतपुरवठा योजना राबवली जाते. याअंतर्गत क्रेडिट लाईन १ मधील बचतगटातील प्रत्येक सदस्यास १ लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी हमी शुल्कासह ९ टक्के वार्षिक व्याजदर आहे. तर क्रेडिट लाईन २ मधील बचतगटातील प्रत्येक सदस्यास दीड लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी हमी शुल्कासह पुरुषांसाठी १२ टक्के तर महिलांसाठी १० टक्के वार्षिक व्याजदर आहे.