शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीच्या स्थापनेसाठी महिनाभराची मुदत


मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समिती गठन करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. पुढील एका महिन्यात सर्व शाळांमध्ये या समित्यांचे गठन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी या अनुषंगाने केसरकर यांची भेट घेतली. यावेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल (ऑनलाईन), प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, उपसचिव समीर सावंत, मुंबई विभागीय उपसंचालक संदीप संगवे यांच्यासह सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक (ऑनलाईन) आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याचबरोबर त्यांची सुरक्षा, शाळेमधील पोषक वातावरण, विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांचे समुपदेशन आदींसाठी शासनाने शाळा, केंद्र, तालुका अशा विविध पातळ्यांवर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबत १० मार्च २०२२ रोजी परिपत्रक जारी केले आहे.

याची तातडीने अमलबजावणी करण्यात येऊन जेथे समिती कार्यरत नसेल तेथे एका महिन्यात समिती गठन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे पालकांमध्ये देखील याबाबत जागृती करावी, असे केसरकर यांनी सांगितले.

शाळेत समतामुलक वातावरण राहील यासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबविले जावेत. निकोप वातावरण निर्मिती करावी. तसेच अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत असलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या ‘चिराग’ ॲपची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असेही केसरकर यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!