२६ दिवसांनंतर ‘बलात्कारी’ प्रा. अशोक बंडगरची पत्नी घरी अवतरली, न्यायालयाने दिले अटकेपासून संरक्षण!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर २६ दिवसांपासून फरारच असून त्याला या गुन्ह्यात मदत करणारी त्याची पत्नी पल्लवी मात्र काल रात्री बेगमपुऱ्यातील घरी अवतरली. न्यायालयाने पल्लवीला १५ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.

वंशाचा दिवा हवा म्हणून मुलगाच हवा या वेडाने झपाटलेल्या प्रा. डॉ. अशोक बंडगरच्या विरोधात त्याच्या पत्नीसह २५ एप्रिल रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६(न), १०९, ११४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बंडगर त्याची पत्नी आणि दोन मुलींसह फरार झाला. तेव्हापासून तो ‘फरार’च आहे.

बंडगरने अटकपूर्व जामिनासाठी जोरदार आटापिटा चालवला असला तरी १२ मे रोजी सत्र न्यायालयाने बंडगर व त्याच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही अशोक बंडगर पोलिसांना शरण आलेला नाही. तो अद्यापही फरारच आहे. पोलिसांना त्याचा अद्याप ठाव ठिकाणा लागलेला नाही. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर अशोक बंडगरची पत्नी पल्लवीने न्यायालयाकडे अटकेपासून संरक्षण मागितले होते.

त्त्यात न्यायालयाने अशोक बंडगरची पत्नी पल्लवीला थोडासा दिला आहे. १५ जूनपर्यंत पल्लवीला न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.  त्यामुळे पल्लवी बंडगर तब्बल २६ दिवासंनंतर शनिवारी रात्रीच तिच्या बेगमपुऱ्यातील घरी अवतरली. गुन्हा दाखल झाल्याच्या दिवसापासून अशोक बंडगरसोबत पल्लवीही फरार होती.

पल्लवी बंडगरला अटकेपासून संरक्षण मिळालेले असले तरी तिला या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना सहकार्य करावे लागणार आहे. पोलिस तिची चौकशी करू शकतात आणि या गुन्ह्याशी संबंधित अधिक माहिती मिळवू शकतात. पल्लवी बंडगर घरी परतल्यामुळे अशोक बंडगरचा ठावठिकाणा शोधून काढण्यात पोलिसांना मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे.

अशोक बंडगरचा ठावठिकाणा शोधण्यासाठी बेगमपुरा पोलिसांनी त्याचे सर्व मोबाइल नंबर, आधार कार्डवर नवीन सीम कार्ड घेतल्यास ते सीम कार्ड आणि बँकेचे एटीएमही ट्रेसिंगला टाकले आहेत. परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून अशोक बंडगरने आतापर्यंत एकदाही एटीएममधून पैसे काढले नाहीत किंवा स्वतःच्या मोबाइलवरून कुणाशीही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे अशोक बंडगर नेमका लपला कुठे? हे शोधून काढणे अवघड झाले आहे. बेगमपुरा पोलिस बंडगरच्या ठावठिकाण्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशोक बंडगरच्या गुन्ह्यात पल्लवीची काय भूमिका?

अशोक बंडगर करत असलेल्या लैंगिक अत्याचाराबद्दलची माहिती पीडित विद्यार्थीनीने पल्लवी बंडगरला दिली. पण पल्लवीनेही सहमती दर्शवली होती. पीडित तरूणीवर दोघेही अत्याचार करत होते. तिच्यावर गर्भवती राहण्यासाठी दोघांकडून दबाव आणला जात होता. त्यामुळे अशोक बंडगरच्या गुन्ह्यात पल्लवी बंडगरही सहभागी आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होताच अशोक बंडगरसोबतच दोन मुलींना घेऊन पल्लवी बंडगरही फरार झाली होती. पण १५ जूनपर्यंत न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ती बेगमपुऱ्यातील घरी परतली आहे.

 बंडगरला होऊ शकते आजीवन कारावासी शिक्षा

बेगमपुरा पोलिसांनी अशोक बंडगर व त्याची पत्नी पल्लवी बंडगरविरुद्ध भादंविच्या  कलम ३७६ (न)  गुन्हा दाखल केला आहे. या गुनह्यात एकाच महिलेवर वारंवार बलात्कारासाठी दहा वर्षांपेक्षा कमी नसेल, परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल अशी म्हणजे त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित भागासाठी सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!