नांदेडः गावात भीमजयंती साजरी केल्याच्या रागातून नांदेड तालुक्यातील बोंढार हवेली येथील सवर्ण गावगुंडांनी अक्षय भालेराव या २३ वर्षीय बौद्ध तरूणाची निर्घृण हत्या केली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे हे सोमवार दिनांक ५ जून रोजी नांदेडमध्ये येत असून ते बोंढार हवेलीत अक्षय भालेरावच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर भूमिका जाहीर करणार आहेत.
सोमवारी दुपारी १ वाजता प्रा. कवाडे हे बोंढार हवेली येथे जाऊन अक्षय भालेरावच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत. यावेळी पीआरपीचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, प्रदेश महासचिव बापुराव गजभारे हे त्यांच्या समवेत असणार आहेत.
बोंढार हवेलीत भालेराव कुटुंबाची भेट घेतल्यानंतर दुपारी ३ वाजता प्रा. कवाडे हे शिवाजीनगर येथील अतिथी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावातील बौद्ध तरूण अक्षय भालेराव याची गावातील सवर्ण गावगुंडांनी १ जून रोजी पोटात चाकूचे सपासप वार करून निर्घृण हत्या केली. अक्षय भालेरावने पुढाकार घेऊन गावात भीम जयंती साजरी केल्याचा राग मनात धरूनच या गावगुंडांनी अक्षयवर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे.
हेही वाचाः आणखी किती अक्षय भालेरावचे बलिदान?
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून सात जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सामूहिक हत्येच्या कटाचा गुन्हा दाखल करून अक्षय भालेरावच्या कुटुंबीयांना तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केली आहे.