नांदेडः नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावातील बौद्ध तरूण अक्षय भालेराव याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी खून आणि ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सात आरोपींना अटकही केली आहे. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गावात भीम जयंती साजरी केल्यामुळे गावातील मराठा तरूणांनी अक्षयची निर्घृणपणे हत्या केली, असा अक्षयच्या कुटुंबियांचा आरोप आहे. मात्र वरातीत नाचण्याच्या वादातून हा खून झाल्याचे सहायक पोलिस निरीक्षक पवार यांचा दावा आहे.
बोंढार हवेली गावात घडलेल्या या घटनेमुळे समाजमन हळहळले आहे. ही घटना कशी घडली? अक्षय भालेरावच्या हत्येचे खरे सूत्रधार कोण? याबाबतचा उलगडा अक्षय भालेरावचा २९ वर्षीय भाऊ आकाश भालेराव याने नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात सविस्तरपणे झालेला आहे. आकाश भालेराव यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेला जबाब जशाचा तसा….
‘मी आकाश श्रावण भालेराव (वय २९ वर्षे) व्यवसाय- टेन्ट हाऊस मजूर. रा. बोंढार हवेली तालुका जिल्हा नांदेड. समक्ष पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे हजर राहून विचारले वरून जबाब देतो की, मी परिवारासह वरील ठिकाणी रहात आहे. मी माझा मयत झालेला भाऊ अभय तसेच अन्य भाऊ गौतम आणि अजय, आई वंदना व वडील श्रावण यांचेसह राहतो. सर्वजण मोलमजुरी करून जगतात.’
‘आज आमचे गावातील मराठा समाजातील नारायण विश्वनाथ तिडके याचे लग्न बामणी येथे झाल्यावर त्याने बोंढार गावात वऱ्हाडासह येऊन सायंकाळी वरात काढली होती. त्यात ते डीजे लावून डान्स करत करत मुख्य रस्त्याने हातात तलवार, खंजर, लाठ्या काठ्या घेऊन ओरडत ओरडत चालले होते. त्या दरम्यान विठ्ठल तिडके याचे घरासमोरील कामाजी तिडके यांच्या दुकानावर मी व माझा भाऊ अक्षय श्रावण भालेराव आम्ही किराणा सामान आणण्यासाठी गेलो होतो. तेथे लाईटचा लख्ख उजेड होता.’
‘सायंकाळी अंदाजे साडेसात वाजण्याची वेळ असावी. आम्हास तेथे बघून संतोष तिडके हा मोठमोठ्याने ओरडून आम्हाला जातीवरून शिव्या देऊन यांना तर जीवे मारले पाहिजे… गावात भीम जयंती काढता का? असे मोठ्याने म्हणत होता. त्यानंतर कृष्णा गोविंद तिडके, निळकंठ रमेश तिडके, नारायण विश्वनाथ तिडके, शिवाजी दिगंबर तिडके या सर्वांनी लाठ्या-काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी माझ्या भावास मारहाण केली. त्यानंतर वरील सर्वांनी माझ्या भावाचे हात व पाय धरून ठेवले आणि त्यातील संतोष म्हणाला- दत्ता खतम करून टाक याला…’
‘तेव्हा संतोष व दत्ता यांनी त्यांच्या हातात असणाऱ्या खंरजने माझ्या भावाच्या पोटात सपासप वार केले. तेव्हा माझा भाऊ मेलो-मेलो, वाचवा वाचवा… असे म्हणत ओरडत होता. तेव्हा मी माझ्या भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडलो असता तेथे असलेले महादू गोविंद तिडके, बाबुराव सोनाजी तिडके व बालाजी मुंगल या सगळ्यांनी ‘खतम करून टाका’ असे म्हणत मलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा दत्ता विश्वनाथ तिडके याने त्याचे हातात असलेल्या खंजीरने माझ्या डाव्या दंडावर वार केला. त्यात मी जखमी होऊन माझे रक्त वाहू लागले. त्यानंतर वरील सर्वांनी एकत्र येऊन आमचे बौद्ध वस्तीवर जोरदार दगडफेक केली.’
‘माझी आई वंदनाने माझ्या लेकरांना सोडा असे म्हणत विनवणी केली. पण अशाही परिस्थितीत महादू गोविंद तिडके, बाबुराव सोनाजी तिडके यांनी लाठ्या-काठ्या व दगडाने माझ्या आईस मारहाण केली. मी यातील सर्व लोकांना प्रत्यक्ष माझे भावावर, आईवर व माझेवर खंजर, लाठ्या-काठ्या व दगडाने हल्ला करून खून करताना पाहिले आहे.’
‘मी वरील सर्वांना ओळखतो. मी वरील सर्वांना माझे भावाला मारू नका, त्याला सोडा अशी अनेकदा विनंती केली. तेव्हा या महाराला आता सोडून उपयोग नाही, असे म्हणून वरील सर्वांनी सामूहिकपणे जोरदार प्राणघातक हल्ला करून माझ्या भावाचा निर्घृण खून केला असून मलाही खंरजचा वार करून जखमी केलेले आहे. यावेळी आम्हास वाचवण्यासाठी आमचे मदतीला निलेश सुरेश भालेराव, संदेश सुरेश भालेराव, धम्मानंद चांगोजी भालेराव आले व त्यांनी सोडवासोडव केली. वरील सर्वांच्या विरोधात माझी कायदेशीर तक्रार आहे.’
आम्ही अक्षयच्या कुटुंबाच्या पाठीशीः सुजात आंबेडकर
बोंढार हवेलीतील घटनेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘काल अत्यंत चीड आणणारी नांदेड येथील घटना समोर आलीय. अक्षय भालेराव या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. त्यामागील कारण असं समजले की, त्याने यंदा गावात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा केल्याचा राग गावातील तथाकथित उच्चवर्णीयांना होता. त्या रागातून त्याची हत्या करण्यात आली. या हत्येचा तीव्र शब्दांत मी निषेध करतो. कालकथीत अक्षय भालेराव हा त्याच्या गावातील वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखेचा पदाधिकारी होता. त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून सोबत आहे. प्रशासनाने सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी’, असे त्यांनी म्हटले आहे.