नांदेडः गावात भीम जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून लग्नाच्या वरातीत तलवार, खंजर घेऊन नाचणाऱ्या सर्वण गावगुंडांकडून एका २३ वर्षीय दलित तरूणाची पोटात चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात गुरूवारी रात्री घडली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे बोंढार हवेली गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री बोंढार हवेली गावात गुरूवारी विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्यानिमित्त वरात काढण्यात आली होती. वरातीत काही युवक डीजेच्या दणदणाटात नाचत होते. त्यावेळी गावातीलच अक्षय भालेराव हा दलित युवक तेथे आला. या वरातीत तलवारी, खंजर घेऊन नाचत असलेल्या सवर्ण गावगुंडांनी त्याच्यावर हल्ला चढवला.
या सवर्ण गावगुंडांनी अक्षयचे हात-पाय धरून त्याच्या पोटात चाकूने सपासप वार केले. त्यानंतर या सवर्ण गावगुंडांनी बौद्ध वस्तीवर तुफान दगडफेकही केली. या दगडफेकीत काहीजण जखमीही झाल्याची माहिती आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अक्षयला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर बोंढार हवेली गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध खून आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून दोन फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
अक्षय भालेरावने पुढाकार घेऊन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून वरातीत नाचणाऱ्या युवकांनी वचपा काढल्याची चर्चा गावात आहे. अक्षय भालेराव हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता होता.
बोंढार हवेली गावात दलित तरूणाच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या गावात मोठा फौजफाटा तैनात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.