नाफेड आणि एनसीसीएफ करणार महाराष्ट्राकडून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, देशातील ७० टक्के कांदा घेणार एकट्या नाशिकमधून!


नाशिक: एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती, एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी नाशिकमध्ये दिली.

देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी करणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले. नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे.

आतापर्यंत एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत अंदाजे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. एनसीसीएफने २ लाख ८९ हजार ८४८ मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवणार असल्याचेही चंद्रा यांनी सांगितले.

मूगडाळ, तांदूळही अत्यल्प दरात विक्री करणार

एनसीसीएफच्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी दिल्ली, कोलकाता, पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नाशिक अशा ११४ शहरांमध्ये १ हजार १५५ मोबाइल व्हॅनद्वारे २५ रुपये प्रति किलोने कांदा विक्री सुरू केली आहे. कांदा, गव्हाचे पीठ, डाळींपाठोपाठ एनसीसीएफतर्फे मूगडाळ आणि तांदूळदेखील अत्यल्प दरात विक्री करणार असल्याची माहिती चंद्रा यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!