नरेंद्र मोदींवर ‘बजरंग बली कोपला’: कर्नाटकात भाजप चारी मुंड्या चित, कन्नडिगांचे काँग्रेसला एकतर्फी बहुमत!


बंगळुरूः पराभव दृष्टीपथात दिसताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या मतदारांना ‘जय बजरंग बली बोलो और कमल का बटन दबाओ’ अशी साद घालूनही त्यांना बजरंग बली पावला नाही. उलटपक्षी बजरंग बलीचा मोदींवर कोप झाल्यामुळे कर्नाटकच्या मतदारांनी भाजपला चारी मुंड्या चित करत काँग्रेसला एकतर्फी बहुमत बहाल केले आहे. काँग्रेसने आतापर्यंत १३६ जागांवर आघाडी (विजयी ११९) घेतली असून भाजपचे दुकान केवळ ६४ जागांवरच गुंडाळले असल्याचे चित्र आहे. कर्नाटकमधील या अभूतपूर्व यशामुळे भाजपविरोधी शक्तींचा आत्मविश्वास दुणावला असून कर्नाटक निवडणुकीचे निकाल म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांची नांदी असल्याचा ठोकताळा ते बांधू लागले आहेत.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. या निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार आता काँग्रेस कर्नाटकमध्ये बहुमताचे सरकार स्थापन करणार आहे. कानडी जनतेने या निवडणुकीत भाजपला चारी मुंड्या चित करून अस्मान दाखवत काँग्रेसच्या बाजूने भरभरून कौल दिला आहे. एवढेच नव्हे तर कानडी जनतेने भाजपच्या १३ मंत्र्यांना पराभूत केले आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील कर्नाटक विधानसभेच्या निकालांची ५ वाजून ३४ मिनिटांपर्यंतची आकडेवारी पाहता काँग्रेस १३६ (विजय-११९, आघाडी-१७), भाजप ६४ (विजय-५५, आघाडी-९), जेडीएस २० (विजय-१८, आघाडी-२ आणि अपक्ष ४ असे पक्षीय बलाबल स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीचे वैशिष्ट्ये असे की भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळातील तब्बल १३ मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ३३ प्रचारसभा घेतल्या. २८ रोडशो केले. निवडणुकीच्या प्रचारात रडगाणे गात मला काँग्रेसने आतापर्यंत ९९ वेळा शिव्या दिल्याचे सांगून कानडी मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला. या औषधाची मात्रा लागू होत नाही, असे दिसू लागल्यानंतर त्यांनी या निवडणुकीत थेट बजरंग बलीलाच उतरवले आणि ‘बजरंग बली का नारा लगाएं और कमल का बटन दबाएं’ अशी हाक कानडी मतदारांना घातली. तरीही मोदींना बजरंग बली पावला नाही. उलट बजरंग बलीचा कोप झाला आणि कर्नाटक निवडणुकीत भाजप चारी मुंड्या चित झाला.

या निवडणुकीचे कल समजल्यानंतर प्रधानमंत्री मोदींनी प्रतिक्रिया दिली. कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी पाठिंबा दिला, त्या सर्वांना धन्यवाद. भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीत केलेल्या कष्टाचे मी कौतुक करतो. आम्ही आगामी काळात कर्नाटकच्या जनतेची अधिक जोमाने सेवा करू, असे मोदी म्हणाले.

सर्व आश्वासने पूर्ण करूः राहुल गांधी- कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार राहुल गांधी यांनीही या निकालांवर प्रतिक्रिया दिली. कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती, तर दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती. गरिबांच्या शक्तीने भांडवलदारांच्या शक्तीला पराभूत केले. हेच पुढे प्रत्येक राज्यात होईल. आम्ही कर्नाटकच्या जनतेला दिलेली पाच आश्वासने पहिल्या दिवशीच्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू, असे राहुल म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!