अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे भाजपचा ‘बाहुबली’ नेता जिल्ह्यातून हद्दपार!


चंद्रपूरः भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजप नेत्याला पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरातील भाजप नेते खेमचंद गरपल्लीवार असे हद्दपार केलेल्याचे नाव आहे. विशेष म्हणजे गरपल्लीवार हे गोंडपिपरीतील ‘बाहुबली’ नेते म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर २०२२ मध्येच त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी येथील खेमचंद गरपल्लीवार यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गायिका पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी पोलिसांत तक्रार देऊन गरपल्लीवार यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती.

 गरपल्लीवार यांच्यावर आधीही गुन्हे दाखल होते. भाजप कार्यकर्त्यांनी गरपल्लीवार यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी गरपल्लीवार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम ५६ (१)(अ)(ब) अन्वये हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव तयार करून गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठवला. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव मंजूर करून गरपल्लीवार यांच्याविरुद्ध चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश पारित केला.

‘बाहुबली’ गरपल्लीवार तीन महिन्यांपूर्वीच आले होते भाजपातः गोंडपिपरीच्या राजकारणात खेमचंद गरपल्लीवार यांचा मोठा दबदबा आहे. गोंडपिपरी नगपंचायतीत सत्ता बदलाची चर्चा रंगू लागली असतानाच खेमचंद यंनी त्यांच्या नगरसेविका पत्नी शारदा यांच्यासोबत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर २०२२ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. गोंडपिपरीत ‘चाणाक्ष राजकारणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गरपल्लीवार यांच्यावरच आता चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार होण्याची वेळ आली आहे.

अमृता फडणवीसांवर का केली होती पोस्ट?:  अमृता फडणवीस यांनी जून २०२२ मध्ये पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना वेश्या व्यवसायाबद्दल वक्तव्य केले होते. वेश्या व्यवसायामुळे समाजात संतुलन राहते. त्यामुळे या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्वीकार करा, असे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

 ‘वेश्या व्यवसायामुळे समाजात संतुलन राखले जाते. हा व्यवसाय पुरातन काळापासून आहे. इतर देशात या व्यवसायाकडे आदराने पाहिले जाते. जर्मनी त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे त्याचा प्रोफेशन म्हणून स्वीकार करायला हवा. मी त्यांच्या पाठीशी आहे,’ असे फडणवीस यांनी भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने पुण्यातील लालबत्ती भागातील महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात बोलताना म्हटले होते. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून गरपल्लीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. तिच पोस्ट आता त्यांच्या अंगलट आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!