मुंबईः सध्या सगळीकडे मावळत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट आणि न्यू ईयर सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्ट्यांमध्ये अनेक जण अल्कोहोलचे सेवन करतात. परंतु अनेकांना अल्कोहोलचे जास्त सेवन केल्यामुळे हँगओव्हरचा त्रास होतो. अशावेळी काही घरगुती उपायांनी हा हँगओव्हर उतरवण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.
भरपूर पाणी प्या
अल्कोहोलच्या सेवनामुळे लोक अधिक प्रमाणात लघवी करतात. त्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ कमी होतात. शरीरातील हे गमावलेले द्रवपदार्थ पुन्हा मिळवण्यासाठी भरपूर पाणी प्या. म्हणजे हँगओव्हरचा त्रास कमी होईल.
टोस्ट खा
टोस्टसारख्या कार्बोहायड्रेटचे सेवन केल्यामुळे हँगओव्हरची लक्षणे कमी होण्यास मदत होते. हे कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे हँगओव्हर उतरण्यास मदत होते.
पुरेसा आराम
हँगओव्हरवर मात करण्यासाठी तुम्हाला भरपूर झोपेची आवश्यकता आहे. थकवा दूर करण्यासाठी शक्य तितकी जास्त झोप घेण्याचा प्रयत्न करा.
जिनसेंग चहा
शरीरातून अल्कोहोल लवकर काढून टाकण्यासाठी जिनसेंग मदत करते. हे अँटी-हँगओव्हर उपाय म्हणूनही कार्य करते आणि अल्कोहोलच्या दुष्परिणामांच्या बाबतीत उपयुक्त ठरू शकते.
आल्याचा चहा
आले हे त्याच्या अंतर्निहित अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे अल्कोहोलचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी नैसर्गिक उपचार आहे. त्यामुळे तुम्हाला हँगओव्हरचा त्रास जाणवू लागला असेल तर भरपूर आले घातलेला काळा चहा प्या. अल्कोहोलच्या नशेपासून मुक्त होण्यासाठी आल्याचा खूप फायदा होतो.
नारळ पाणी
नारळाच्या पाण्यात कोणतेही कृत्रिम घटक नसतात. तुमच्या पसंतीची जी स्पोर्ट ड्रिंक आहे, त्या स्पोर्ट ड्रिंकइतकेच इलेक्ट्रोलाइट्स नारळ पाण्यात देखील असतात. नारळ पाण्यातील हेच इलेक्ट्रोलाइट्स हँगओव्हर कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे हँगओव्हर उतरवण्यासाठी नारळ पाणी प्या.
फळांचा रस
हँगओव्हरच्या त्रासात फळांचा रस घेतल्यामुळे देखील तुम्हाला उत्साहित वाटू लागते. फळांचा रस घेतल्यामुळे मळमळची भावना देखील कमी होते.
हलका व्यायाम
काही हलके स्ट्रेचिंग किंवा आर्म एक्सरसाइज केल्यामुळे तुम्हाला हँगओव्हरपासून थोडा आराम मिळण्यास मदत होते. पण लक्षात ठेवा, हँगओव्हरमध्ये अवघड व्यायाम करू नका.
मधाचे सेवन
अल्कोहोलचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी मध खूपच उपयोगी आहे. मधाच्या सेवनामुळे अल्कोहोल सहज पचते आणि हँगओव्हर निघून जातो.
लिंबाचा रस
लिंबाचा रस देखील हँगओव्हर उतरवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हँगओव्हर उतरवण्यासाठी लेमन-चीचे किंवा लिंबू पाण्याचे वारंवार सेवन करा.
टोमॅटोचा रस
टोमॅटोचा रस हँगओव्हर कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर असते. व्हिटॅमिन सी हँगओव्हर उतरवण्यासाठी मदत करते.
पुदिना
गरम पाण्यात पुदिन्याची चार-पाच पाने टाकून हे पाणी प्यायल्याने हँगओव्हर कमी होतो. पुदिन्याची पाने सेवन केल्यामुळे पोटातील वायूचे विकास दूर होऊन आतड्यांना खूपच आराम मिळतो.