विद्यापीठात पहिल्यांदाच ऑनर्स पदवी अभ्यासक्रम; बीएस्सी इलेक्ट्रॉनिक्स, डाटा सायन्स, बीसीए आणि बीए मानसशास्त्राचाही समावेश


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) चार वर्षे कालावधीचा पदवी ’ऑनर्स’ कोर्स यंदा सुरु होत आहेत. या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये दोन सेमिस्टर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार असून छात्रवृत्तीही देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी दिली.

नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून व्यावसायाभिमुख व चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. यामध्ये ’अ‍ॅप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम’ (एईडीपी) हा चार वर्षाचा पदवी अभ्यासकम असणार आहे. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ९ मे रोजी झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत बी.एस्सी. (ऑनर्स) इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, बी.एस्सी. (ऑनर्स) डाटा सायन्स, बीसीए (ऑनर्स) व बी.ए. मानसशास्त्र (ऑनर्स) अशा चार अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

बी.एस्सी. डेटा सायन्सला ३० तर उर्वरित तीन अभ्यासक्रमांना प्रत्येकी ४० जागा असणार आहेत. या कोर्ससाठी बारावी विज्ञान, कला व वाणिज्य उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रानिक्स, संगणकशास्त्र, व्यवस्थापशास्त्र व मानसशास्त्र विभागाशी संपर्क साधावा, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव माधव वागतकर यांनी कळविले आहे.

नामांकित कंपन्यांसोबत सामंज्यस्य करार

या चारही अभ्यासक्रमांसाठी नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आले आहेत. एमओयू झालेल्या कंपन्यांच्या प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभवही  ऑनर्स पदवीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. एमओयू झालेल्या कंपन्यांमध्ये ’इलेक्ट्रॉनिक्स’ कंपन्यामध्ये देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स, सिमेन्स, सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग, एन्ड्रेस हौजर, व्हेरॉक, स्टारलाईट, व्हिडोओकॉन, धूत ट्रान्समिशन, क्रिश ऑटोमेशन, फ्लॅश इलेक्ट्रानिक्स, रोजन बर्गर, अ‍ॅडोनीस, रेल्कॉन हायोसंग एक्सिटॉनिक या कंपन्यांचा समावेश आहे.

नोकरी, रोजगार देणारे अभ्यासक्रम

पदवी, पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतरही रोजगाराच्या संधी न मिळालेल्या पदवीधरांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर ’मल्टीपल एन्ट्री व मल्टीपल एक्झीट’ या तत्वावर सुरु होणारे हे चारही अभ्यासक्रम शंभर टक्के रोजगार व स्वयंरोजगाराची हमी देणारे असणार आहेत. सीएमआयएसह औद्योगिक संस्था सोबत घेऊन हे कोर्स सुरु करण्यात येत आहेत. या संदर्भात शहरातील उद्योजकांची येत्या १० जून रोजी विद्यापीठात बैठक घेण्यात येणार आहे.
डॉ. वाल्मिक सरवदे, प्रकुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

अभ्यासक्रम असे

 बीसीए (ऑनर्स): ’बीसीए’ हा अभ्यासक्रम वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विभागात सुरु होत आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी मायटेक सोल्यूशन्स, एलबीई ग्रुप, वेन्टीस, क्रिसेडो, यूनिओटेक, एक्सपर्ट ग्लोबल, जेएलएल, बुस्ट मीडिया, टेक सूर्या, एचडीएलसी, इमॅजिका व ब्रेन टेक सॉप्टवेअर या कंपन्यांचा समावेश आहे.

बी. एस्सी. डाटा सायन्स (ऑनर्स): बीएससी ’डाटा सायन्स’ हा अभ्यासक्रम संगणकशास्त्र विभागात सुरु होत आहे. यासाठी एक्सपर्ट ग्लोबल सोल्यूशन, यशश्री प्रेस, फाईंड ऍबिलीटी सायन्सेस या कंपन्यामध्ये या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅप्रेंटिसशिप करता येणार आहे.

बी. ए. (ऑनर्स):  बी.ए. ऑनर्स हा पदवी अभ्यासक्रम मानसशास्त्र विभागात सुरु होत आहे. या कोर्ससाठी शहरातील नामांकित मानसिक रुग्णालये, शांती नर्सिंग होम, डॉ.कादरी मेन्टल हॉस्पिटल, तुपकरी हॉस्पिटल व प्रणित कौन्सिलिंग सेंटर येथे प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेता येणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!