पणजीः महाराष्ट्र आणि कर्नाटकातून गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल भरावा लागणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर गोवा राज्याच्या एन्ट्री पाँइटवर टोलनाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांचे प्रमुख मंत्री आणि रस्ते वाहतूक संचालकांची बैठक शनिवारी पणजीत झाली. या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह तिन्ही राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना टोल आकारणीसाठी गोव्याच्या एन्ट्री पाँइटवर टोलनाके सुरू करण्याचा प्रस्ताव गोवा राज्याकडून रस्ते वाहतूक मंत्रालयाला देण्यात आला आहे. या प्रस्तावाला रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
गोवा राज्याच्या प्रस्तावानुसार मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर गोव्याच्या एन्ट्री पाँइटवर टोलनाके बसवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यात जाणाऱ्या वाहनांसाठी पत्रादेवी सीमेवर टोलनाका बसवला जाण्याची शक्यता आहे. मात्र हे टोलनाके कधीपासून सुरु होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
याच बैठकीत महाराष्ट्रातील अपूर्ण रस्ते महामार्ग प्रकल्पाचा मुद्दाही चर्चिला गेला. गडकरी यांनी अधिकारी आणि ठेकेदारांची चांगलीच झाडाझडती घेतली. महाराष्ट्रातील अपूर्ण रस्ते महामार्ग प्रकल्प फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली असून त्यासाठी निधीच कुठलीच कमरता भासणार नसल्याचे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
मोपा विमानतळाला जोडणारा महामार्ग फेब्रुवारीअखेरपर्यंत पूर्ण झाला पाहिजे, अशी सूचना गडकरी यांनी केली. पत्रादेवी ते काणकोणपर्यंतच्या महामार्गाचे काम काही ठिकाणी थांबले आहे, ते लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना गडकरींनी या बैठकीत दिल्या.