नवी दिल्लीः स्पॅम आणि फ्रॉड कॉलला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले असून सीमकार्डचे नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन नियमानुसार कोणताही यूजर आपल्या पर्सनल मोबाईल नंबरचा वापर प्रमोशन किंवा स्पॅम कॉलसाठी करत असेल तर त्याचा मोबाईल नंबर दोन वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर त्या पत्त्यावर नवीन सीम कार्डही जारी केले जाणार नाही.
स्पॅम कॉल आणि फ्रॉड कॉलपासून मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा देण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिल्यानंतर ट्रायने २३ फेब्रुवारी रोजी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वसंमतीने एक योजना तयार करण्यात आली असून या योजनेचेच रूपांतर नवीन सीम कार्ड नियमांत करण्यात आले आहे.
या नव्या योजनेअंतर्गत ट्रायने प्रमोशन कॉलसाठी वेगळे १० डिजिटचे मोबाईल नंबर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोबाईल नंबरवरून प्रमोशन आणि स्पॅम कॉल ओळखता आले पाहिजे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने स्पॅम आणि फ्रॉड कॉलला आळा घालण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे निर्देशही ट्रायने दिले आहेत.
ट्रायने मोबाईल सेवा पुरवणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना ७ वेगवेगळ्या कॅटेगिरीजमध्ये १० डिजिटचे मोबाईल नंबर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरून मोबाईल वापरकर्त्याला स्पॅम आणि फ्रॉड कॉल ओळखता येऊ शकतील. त्यानंतर हा नंबर ब्लॉक केला जाऊ शकेल. डू नॉट डिस्टर्ब म्हणजेच डीएनडी यंत्रणाही अधिक प्रभावी बनवण्यावर जोर दिला जाणार आहे.
ट्रायने दिलेल्या निर्देशांनुसार तयार करण्यात येणाऱ्या सात कॅटेगिरीजमध्ये बँकिंग, इन्श्यूरन्स, फायनान्स, क्रेडिट कार्डसाठी एक कॅटेगिरी आणि शिक्षण, आरोग्य, वस्तू व ऑटोमोबाईल्स, कम्यूनिकेशन-मनोरंजन-आयटी आणि पर्यटन अशा स्वतंत्र कॅटेगिरीज तयार करण्यात आल्या असून या कॅटेगिरीनुसार प्रमोशन कॉलसाठी नवीन मोबाईल नंबर जारी केले जाणार आहेत.