तुमचा मोबाईल फोन हॅक तर झाला नाही ना? जाणून घ्या फोन हॅक झाल्याची लक्षणे आणि उपाययोजना


मुंबईः  मोबाईल फोन आता सगळ्यांच्याच दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. काळाची गरज ओळखून मोबाईल फोन अधिकाधिक स्मार्ट होत चालले आहेत. त्यातच  आजकाल सर्वकाही डिजिटल होऊ लागले आहे. त्यामुळे मोठमोठे महत्वाचे व्यवहार आणि देवाणघेवाणही आजकाल स्मार्टफोनच्या माध्यमातूनच फोन बँकिंगद्वारे केली जाऊ लागली आहे. आपली महत्वाची सर्व कादगपत्रेही आपण मोबाईल फोनमध्येच ठेवू लागलो आहोत. अशात तर तुमचा मोबाईल फोन हॅक झाला तर?  किती मोठा तोटा होऊ शकतो याचा विचारच न केलेला बरा.

या डिजिटल दुनियेत तुमचा स्मार्टफोन कोणत्याही खजिन्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे हा खजिना लुटण्यासाठी हॅकर्स टपूनच बसलेले आहेत. मात्र काही खबरदारी घेऊन तुम्ही या लुटीपासून स्वतःला वाचवू शकता. पण तुमचा मोबाईल फोन हॅक झाला की नाही? हे कसे ओळखणार? ही आहेत मोबाईल फोन हॅक झाल्याची लक्षणे:

बॅटरी झपाट्याने उतरत असेल तर…

तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी लवकर संपत असेल किंवा झपाट्याने उतरत असेल तर तुमचा मोबाईल फोन हॅक झाल्याचा हा संकेत आहे. हॅकर्सनी तुमच्या मोबाईल फोनमध्ये कोणताही मालवेअर टाकला की तो फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये सतत ऍक्टिव्ह असतो आणि काम करत असतो. परिणामी तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी वेगाने उतरते. तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी झपाट्याने उतरत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. अशा वेळी तुम्ही तुमचा फोन पूर्णतः फॉरमॅट मारू शकता किंवा अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये तुमचा मोबाईल फोन दाखवू शकता.

फोन सतत बंद किंवा रिस्टार्ट होत असेल तर…

तुमचा मोबाईल फोन सतत बंद होत असेल किंवा आपोआप रिस्टार्ट होत असेल तर तुमचा मोबाईल फोन हॅकर्सच्या ताब्यात गेलाय, असे समजावे. तुमच्या फोनच्या सेटिंग्ज आपोआप बदलल्या आहेत, असे जर तुम्हाला वाटत असेल तरी तुमच्या मोबाईल फोनमध्ये हॅकर्सनी प्रवेश केल्याचा तोही एक संकेत आहे. अशावेळी डाऊनलोड केलेली फाईल ताबडतोब तपासा किंवा मोबाईल फोन तत्काळ फॉरमॅट मारा.

फोन स्लो झाला किंवा लवकर गरम होत असेल तर…

जर तुमचा मोबाईल फोन जर अचानक स्लो चालू लागला असेल तर तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. कारण बऱ्याच वेळा हॅकर्स त्यांच्या चुकीच्या कामांसाठी तुमचा मोबाईल फोन हॅक करून वापरू शकतात. इंटरनेट स्पीड चांगला असूनही तुमच्या मोबाईल फोनवर व्हिडीओ स्लो चालत असेल किंवा तुमचा डेटा जास्त वापरला जात असेल तर ते तुमचा मोबाईल फोन हॅक झाल्याचे लक्षण आहे. याशिवाय तुमचा मोबाईल फोन लवकर गरम होत असेल तरीही तुम्ही खबरदारी घेण्याची गरज आहे.

मोबाईलमधील ऍप्स चालता चालता बंद होत असतील तर…

फोन हॅक करण्यासाठी हॅकर्स अँटीव्हायरस आणि अन्य सुरक्षा सॉफ्टवेअर बंद करतात. तुमचा अँटीव्हायरस काम करत नाही, असे तुमच्या मोबाईल फोनमधील अनेक ऍप्स चालता चालताच अचानक बंद होत असतील तर ते तुमचा मोबाईल फोन हॅक झाल्याचे लक्षण आहे. तुमच्या लक्षात आले तर सावध व्हा. याशिवाय तुमच्या मोबाईल फोनचा इंटरनेट ब्राऊजर नेहमी तपासत राहा. कारण तुमच्या ब्राऊजरमध्ये असणाऱ्या एक्सटेंशनमुळे तुमच्या मोबाईल फोनची माहिती लिक होऊ शकते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी फोनचे ऍप्स सतत अपडेट करत राहा.

बँकिंग व्यवहार झाल्याचे फेक मेसेज येत असतील तर…

तुमचा मोबाईल फोन हॅक झालाय हे कळण्याचा आणखी एक महत्वाचा संकेत म्हणजे तुम्ही न केलेल्या ट्रान्झॅक्शनचे मेसेज येऊ लागतात. बऱ्याच वेळा तुम्ही न घेतलेल्या गोष्टींच्या खरेदीचे आणि तुम्ही न केलेल्या व्यवहाराचे मेसेज तुम्हाला येऊ लागतात. याचा अर्थ असा की कोणीतरी तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा बँकिंगचा तपशील कुणीतरी फोन किंवा इतर गोष्टींच्या साह्याने हॅक करत आहे. असे मेसेज येऊ लागल्यास तातडीने बँकेची मदत घ्या आणि त्या खात्यातून व्यवहार ताबडतोब बंद करा.

कसा सुरक्षित ठेवाल तुमचा मोबाईल फोन?

 इंटरनेटच्या दुनियेत जर तुम्हाला स्वतःला सुरक्षित रहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला सक्रीय रहावे लागणार आहे. एखादी सेटिंग करून तुम्ही स्वतःला कायमचे सुरक्षित ठेवू शकाल, असे अजिबात नाही. तुम्हाला सातत्याने सतर्क आणि सक्रीय रहावे लागेल, ज्यामुळे तुम्ही कुठलीही चूक करणार नाही आणि हॅकर्सच्या जाळ्यात फसणार नाही. स्वतःचा मोबाईल फोन सुरक्षित ठेवण्यासाठी या आहेत काही टिप्सः -तुमचा मोबाईल फोन नेहमी अपडेट करत रहा. केवळ फोनच नाही तर तुमच्या मोबाईल फोनमध्ये असलेले ऍप्सही सतत अपडेट करत रहा. त्यामुळे हॅकर्सला कोणताही लूपहोल मिळणार नाही.

  • तुमच्या ऑनलाइन लाईफस्टाईलला सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी भक्कम आणि यूनिक पासवर्डचा वापर करा.
  • सार्वजनिक वायफाय, चार्जिंग स्टेशनचा वापर करणे टाळा.
  • कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. मग भलेही तो मेसेज तुमच्या ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीने पाठवलेला असला तरीही ही खबरदारी घ्या.
  • ब्लूटूथ आणि वायफायचा वापर झाल्यानंतर ते ते बंद ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!