वजन कमी करण्यासाठी साखरेला पर्याय म्हणून तुम्ही कृत्रिम स्वीटनर वापरताय का?; सावध व्हा, हे आहेत गंभीर धोके!


जिनिव्हाः तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर शुगर म्हणजेच साखरेच्या अन्य पर्यायांचा अजिबात वापर करू नका. साखरेला पर्याय म्हणून वापरले जाणारे कृत्रिम स्वीटनर अत्यंत धोकादायक ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनेच (WHO) तसा इशारा दिला आहे. साखरेला पर्याय म्हणून कृत्रिम स्वीटनरचा वापर केल्यामुळे वयस्क किंवा मुलांच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी कोणताही दीर्घकालीन लाभ होत नाही. उलट त्याच्या वापरामुळे होणारे तोटेच अधिक आहेत. कृत्रिम स्वीटनरचा सातत्याने वापर केल्यामुळे वयस्कांमध्ये टाइप-२ चा मधुमेह, ह्रदय व रक्त वाहिन्यांशी संबंधित आजार  आणि मृत्युदराची जोखीम वाढते, असे उपलब्ध पुराव्यांची व्यवस्थित समीक्षा केल्यानंतर स्पष्ट झाले आहे, असे हूने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने साखरेसह स्वीटनरच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. साखरेला साखरविरहित स्वीटनरमध्ये बदलल्यामुळे लोकांना त्यांचे वजन दीर्घकाळापर्यंत नियंत्रित ठेवण्यात कोणताही फायदा होत नाही. आम्हाला अल्पावधीत शरीराच्या वजनात थोडीशी घट झालेली दिसली. परंतु वजनातील ही घट निरंतर राहणारी नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पोषण व अन्न सुरक्षा विभागाचे संचालक फ्रान्सेस्को ब्रांका यांनी म्हटले आहे.

साखरेला पर्याय म्हणून कृत्रिम स्वीटनरचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे अनपेक्षित आणि नको असलेले परिणाम दिसू शकतात. टाइप-२ चा मधुमेह आणि ह्रदय रोगाची थोडीशी वाढलेली जोखीम, असे ब्रांका म्हणाले. ही शिफारस स्वीटनरच्या वापराबद्दलच्या सुरक्षेवर टिप्पणी करण्यासाठी नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

साखरविरहित कृत्रिम स्वीटनरचा मोठ्या प्रमाणावर पॅकेज्ड म्हणजेच आधीपासूनच तयार केलेले खाद्य पदार्थ आणि पेय पदार्थांमध्ये केला जातो. कधी कधी लोकांकडून थेट भोजन आणि पेय पदार्थांतही त्याचा वापर केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने २०१५ मध्ये साखरेच्या सेवनाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यात वयस्क आणि मुलांनी त्यांच्या एकूण ऊर्जा सेवनाच्या १० टक्क्यांपेक्षाही कमी शर्करा दिवसातून सेवन केली पाहिजे, असे म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या या शिफारशीनंतर साखरेला पर्याय म्हणून कृत्रिम स्वीटनर वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

या नवीन मार्गदर्शक सूचना  ताज्या वैज्ञानिक तथ्यांच्या गहन मूल्यांकनावर आधारित आहेत. वजन कमी करण्यासाठी कृत्रिम स्वीटनरचा वापर ही काही चांगली रणनीती नाही, यावर या मार्गदर्शक सूचना भर देतात, असे पोषण संशोधक इयान जॉनसन यांनी म्हटले आहे.

लोकांनी शुगर स्वीटनर्स ड्रिंकचा वापर कमी केला पाहिजे आणि गोडाचा स्त्रोत म्हणून कच्ची किंवा प्रोसेस्ड फळांचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे इयान जॉनसन यांनी म्हटले आहे.

या शिफारशीचा स्वच्छता उत्पादनांशी संबंध जोडण्यात येऊ नये. स्वच्छता उत्पादनांमध्ये कृत्रिम शर्करा असलेले टूथपेस्ट, त्वचेच्या क्रीम आणि औषधांचा समावेश आहे. यात लो कॅलरी शुगर आणि शुगर अल्कोहोलचा समावेश नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!