नवी दिल्लीः दूरसंचार विभाग किंवा टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडियाचे (ट्राय) नाव घेऊन काही जणांना मोबाइल डिस्कनेक्ट करण्याची धमकी देणारे कॉल्स सायबर भामट्यांकडून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने ऍडव्हायजरी जारी केली असून अशा धमक्यांच्या कॉल्सबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत काही जणांना सायबर भामट्यांकडून फोन कॉल्स येत आहेत. दूरसंचार विभाग किंवा ट्रायमधून बोलत असल्याचे सांगून हे सायबर भामटे मोबाइल डिस्कनेक्ट करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. दूरसंचार विभाग आणि ट्रायकडे अशा अनेक तक्रारी आल्यानंतर आता दूरसंचार विभागाने ऍडव्हायजरी जारी केली आहे.
‘दूरसंचार विभाग किंवा ट्रायच्या वतीने तुमचा मोबाइल डिस्कनेक्ट करण्याची धमकी देणारे कॉल आल्यास ते त्वरित डिस्कनेक्ट करा. कारण आम्ही असे कोणतेही कॉल करत नाही. अधिकृत संप्रेषण जर काही अशल्यास ते आपल्या मोबाइल ऑपरेटरच्या अधिकृत बेवसाइट/ ऍप/ अधिकृत स्टोअरमधून असेल, असे दूरसंचार विभागाने जारी केलेल्या ऍडव्हायजरीमध्ये म्हटले आहे.
कुठे नोंदवायची तक्रार?
तुमचा मोबाइल डिस्कनेक्ट करण्याची धमकी देणारा असा कोणताही कॉल आल्यास तो लगेच डिस्कनेक्ट करा आणि त्याबाबतची तक्रार ज्या मोबाइल क्रमांकावरून तुमच्याशी संपर्क साधला गेला, त्या क्रमांकासह www.sancharsaathi.gov.in वर नोंदवा, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.