नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपताच देशातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) झटका दिला आहे. आता राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणे महागात पडणार असून एनएचएआयने टोलच्या दरात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरूही करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गांवरील टोलच्या दरात दरवर्षी वाढ करण्यात येत असते. हा दरवर्षीच्या नियमित प्रक्रियेचा भाग आहे. ही दरवाढी आधीच केली जाणार होती. परंतु निवडणूक आचारसंहितेच्या काळात टोलची दरवाढ करण्यात येऊ नये, असे निवडणूक आयोगाचे निर्देश होते. त्यामुळे निवडणूक काळात ही टोल दरवाढ रोखण्यात आली होती, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच एनएचएआयने २ जूनच्या मध्यरात्रीपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलच्या दरात ३ ते ५ टक्के वाढ केली आहे. आज सोमवारपासून देशभरातील १ हजार १०० टोल प्लाझावर टोल दरवाढ लागू करण्यात आली आहे.
अमूलचे दूधही दोन रुपयांनी महागले
निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच देशातील नागरिकांना महागाईचे झटके देण्यास सुरूवात झाली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. अमूल दुधाचे वाढीव दर आज सोमवारपासून लागू झाले आहेत.
नव्या दरानुसार अमूल गोल्ड दुधाच्या अर्धा लिटर पाऊचसाठी आता ३२ रुपायांऐवजी ३३ रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गोल्डचा एक लिटरचा पाऊच आता ६४ रुपयांऐवजी ६६ रुपयांना मिळणार आहे. अमूल ताजा दुधाच्या अर्धा लिटर पाऊचसाठी २६ रुपयांऐवजी २८ रुपये अमूल शक्तीच्या अर्धा लिटर पाऊचसाठी २९ रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत.