
नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२-२३ एप्रिल २०२५ रोजी केलेल्या १२ तासांच्या सौदी अरब दौऱ्यावर भारत सरकारचे तब्बल १५ कोटी ५४ लाख ३ हजार ७९२ रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे या एकूण खर्चात हॉटेलचेच बिल १० कोटी २६ लाख ३९ हजार ६५८ रुपये आहे.
आरटीआयमधून ही माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अजय बासुदेव बोस यांनी हा आरटीआय अर्ज दाखल केला होता. सौदी अरबच्या जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून प्राप्त झालेल्या या माहितीमुळे प्रधानमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या सरकारी खर्चाबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.
‘द वायर’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा सौदी अरबचा मूळ दौरा दोन दिवसांचा म्हणजे २२ व २३ एप्रिल २०२५ असा होता. परंतु जम्मू-काश्मिरातील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांना आपला हा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले होते.
प्रधानमंत्री मोदी हे मायदेशी परत येत असल्याची बातमी २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११ वाजताच आली होती. मोदींनी सौदी अरबमधील शासकीय रात्रभोजनात सहभागी होण्याऐवजी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आणि ते २३ एप्रिलच्या सकाळी सकाळी दिल्लीला पोहोचले.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला नसता तर मोदी २३ एप्रिलचा पूर्ण दिवस सौदी अरबमध्येच थांबणार होते. परंतु या हल्ल्यामुळे १२ तासांपेक्षा थोडासा अधिक वेळच ते सौदी अरबमध्ये थांबले. प्रधानमंत्री मोदी २२ एप्रिल रोजी भारतातून सकाळी ९.३० वाजता जेद्दाहसाठी रवाना झाले होते आणि दुपारी पोहोचले. तर २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास दिल्लीला पोहोचले होते.
आरटीआयमध्ये मागितलेल्या माहितीच्या उत्तरात देण्यात आलेल्या खर्चाच्या विभागणीतून चिंताजनक चित्र समोर आले आहे. एकूण १५.५४ कोटी रुपयांच्या या खर्चात हॉटेल रेंटल चार्जेच्या नावाखाली १० कोटी २६ लाख ३९ हजार ६५८ रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. हा खर्च एकूण खर्चाच्या तब्बल ६६ टक्के एवढा आहे. तर परिवहनावर झालेला खर्च ४ कोटी ५ लाख ७९ हजार ९३० रुपये आहे.
मोदींच्या सौदी अरब दौऱ्यातील हॉटेलचे बिल आणि परिवहन खर्चाची रक्कम एकूण खर्चाच्या रकमेतून वजा केली तर १ कोटी २१ लाख ८६ हजार २०२ रुपये शिल्लक राहतात. परंतु आरटीआयमध्ये या खर्चाचे कोणतेच विवरण देण्यात आलेले नाही, असे ‘द वायर’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
विशेष म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सौदी अरबच्या राजकीय दौऱ्यावर होते. सामान्यतः राजकीय दौऱ्यावर जाणाऱ्या नेत्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था यजमान देशाच्या सरकारकडूनच केली जाते. त्यामुळे जर सौदी अरब सरकार मोदींच्या अतिथ्याची जबाबदारी घेण्यास तयार होते तर भारत सरकारने एवढा मोठा प्रचंड खर्च हॉटेलच्या बिलावर का केला?, असा गंभीर सवाल निर्माण होऊ लागला आहे.
यंदा जुलै २०२५ पर्यंत प्रधानमंत्री मोदी हे १६ देशांच्या दौऱ्यावर गेले होते. त्यापैकी ११ देशांच्या दौऱ्यांवरील खर्चाची माहिती उपलब्ध नाही. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत माहिती दिली होती. ती अशी-
| देश | खर्च (कोटीत) | कालावधी | प्रतिदिन खर्च |
| फ्रान्स | रू. २५,५९,८२,९०२ (२५.२९) | १० ते १३ फेब्रुवारी (४ दिवस | रू. ६.४० कोटी |
| अमेरिका | रू. १६,५४,८४,३०२ (१६.५४) | १३ फेब्रुवारी (१ दिवस) | १६.५४ कोटी |
| थायलंड | रू. ४,९२,८१,२०८ (४.९२) | ३-४ एप्रिल (१ दिवस) | ४.९२ कोटी |
| श्रीलंका | रू. ४,४६,२१,६९० (४.४६) | ४ ते ६ एप्रिल (३ दिवस) | ४८ कोटी |
| सौदी अरब | रू. १५,५४,०३,७९२.४७ (१५.५४) | २२ एप्रिल (१ दिवसापेक्षाही कमी) | १५.५४ कोटी |
प्रधानमंत्री मोदी यांच्या मॉरीशस (२ दिवस), सायप्रस, कॅनडा, क्रोएशिया (५ दिवस), आफ्रिका –लॅटिन अमेरिका (५ देश, ८ दिवस), ब्रिटन व मालदिव (४ दिवस) या परदेश दौऱ्यांवर करण्यात आलेल्या खर्चाची माहितीच उपलब्ध नाही. खर्चाची माहिती उपलब्ध असलेल्या देशांच्या दौऱ्यांची तुलना केली असता प्रधानमंत्री मोदी यांचा सौदी अरबचा दौरा अन्य देशांच्या तुलनेत खर्चाच्या बाबतीत सर्वात महागडा ठरला आहे.

