रामदेव बाबांच्या दिव्य फार्मसीला एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणकाः  ७३ लाखांहून अधिक किंमतीचा ‘मिसब्रँडेड’ औषधसाठा जप्त


मुंबईः ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या (एफडीए) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच आक्षेपार्ह जाहिराती असलेल्या मिसब्रँडेड औषधीसाठ्याविरुद्ध एफडीएने राज्यभर धडक कारवाई सुरू केली असून या कारवाईचा सर्वात मोठा दणका योगगुरू बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसी या आयुर्वेदिक औषधे उत्पादन करणाऱ्या कंपनीला बसला आहे. एफडीने राज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई करून दिव्य फार्मसीचा ७३ लाखांहून अधिक किमतीचा आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिसब्रँडेड औषध साठा जप्त केला आहे.

जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

‘औषधे व सौंदर्ये प्रसाधने कायदा १९४०’ व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सुनिश्चित करणे हीच आमची मुख्य जबाबदारी आहे. ती आम्ही तत्परतेने व परिणामकारकरित्या पार पाडू” असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

कुठे जप्त केला किती औषधीसाठा?

आयुक्त मुंढे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना जनतेच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्ये मोहीम राबवण्यात आली. ‘औषधे व जादूटोणाविरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ चा भंग केल्याप्रकरणी विभागनिहाय कारवाईमध्ये नागपूर मधील मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा रु. ७,२६,७५५/- चा साठा जप्त करण्यात आला.

  • नाशिक: मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा एकूण ७,१०,९४५ रुपये किंमतीचा औषध साठा जप्त.
  • पुणेमे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा एकूण १४,६८,९८१ रुपये किंमतीचा साठा जप्त.
  • बृहन्मुंबईमे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १,८५,६०० रुपये किंमतीचा साठा जप्त.
  • कोकण विभागमे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८,५८००० रुपये किमतीचा साठा जप्त.
  • अमरावतीमे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा औषध निरीक्षकांच्या कारवाईत रु. १,४२,२२९/- किमतीचा साठा जप्त.
  • छत्रपती संभाजीनगरः  मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा एकूण रु. ४८७१८/- किमतीचा साठा जप्त.
  • पुणे विभागतपासणीदरम्यान आढळलेल्या ०२ एलोपथी मिसब्रँडेड औषधांचा २१,८३,४२८ रुपये किंमतीचा साठा जप्त.

तुम्हालाही आहे का औषधांबद्दल शंका?

कुठल्याही औषधांवर असलेल्या भ्रामक जाहिरातींवर विश्वास न ठेवता स्वतः च्या मनाने औषधांचे सेवन करू नये. सेल्फ मेडिकेशनमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे अशा उत्पादनाबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन आयुक्तांनी केली आहे.

नवीन मोबाईल ॲप आणि टोल-फ्री क्रमांक: नागरिकांना तक्रार करणे सोपे व्हावे यासाठी प्रशासनातर्फे लवकरच एक नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार आहे, तसेच एक टोल-फ्री क्रमांक देखील कार्यान्वित करण्यात आला आहे.

तक्रार कशी करावी?

औषधांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित एफडीएकडे तक्रार करावी. तक्रार करताना आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक तसेच संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि औषधाचे नाव स्पष्टपणे नमूद करावे.

गोपनीयतेची हमी: नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची अत्यंत गोपनीयतेने पडताळणी करून तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सह आयुक्त (औषधे) गणेश रा. रोकडे यांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!