संभाजीनगरातील दंगलीची होणार एसआयटीमार्फत चौकशी, २५ दंगेखोरांची ओळख पटवण्यात यश ; ८ दंगेखोरांना पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  श्रीराम नवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा भागात झालेल्या दंगलीची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी घेतला आहे. सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सात पोलिस अधिकारी आणि तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक या दंगलीची चौकशी करणार आहे. दरम्यान, या दंगलीस कारणीभूत असलेल्या २० ते २५ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात तरूणांच्या दोन गटात गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर जाळपोळ, दगडफेक आणि हाणामारीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार, अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता. या दंगलीनंतर संभाजीनगर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत श्रीराम नवमीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडला होता. या उत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था स्थिती अबाधित राखण्यात पोलिसांना यश आले.

श्रीराम नवमीचा उत्सव संपल्यानंतर किराडपुऱ्यातील दंगलीप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरूवात केली. या दंगलीत सहभाग असणाऱ्यांपैकी आठ जणांना पोलिसांनी अटक केली. दंगलीत सहभाग असणाऱ्या २० ते २५ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.

किराडपुऱ्यातील दंगलीप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आठ आरोपींमध्ये बरकत शौकत शेख(२३), शेख अतिक शेख हारुण(२४), सद्दामशहा बिस्मिल्ला शहा (३३, तिघेही रा. कटकटगेट), शेख खाजा शेख रशीद (२५, रा. खासगेट), शारेख खान इरफान खान (२३, रा. राजाबाजार), शेख सलीम शेख अजीज (२५, रा. सेंदुरजण, सिंदखेडराजा, जि. बुलढाणा), सय्यद नूर सय्यद युसूफ (३०, रा. गल्ली नंबर ६, बायजीपुरा) आणि शेख नाजीम शेख अहेमद (२४, रा. किराडपुरा) यांचा समावेश आहे.

बुधवारी रात्री आणि गुरूवारी पहाटेपर्यंत चाललेल्या दंगली प्रकरणी जिन्सीचे निरीक्षक अशोक भंडारे यांच्या तक्रारीवरून शौकत चांद शहा, अरबाझ, रिजवान शेख पाशू, मृत शेख मुनीरोद्दीन शेख मोईनोद्दीन, अल्ताफ फेरोज मौलाना, हाश्मी इत्तरवाले यांच्या मुलांसह ४०० ते ५०० जणांवर भादंविच्या कलम ३०७, ३५३, २९५, ३३२, ३३३, ३३६, १४३, १४७, १४८, १४९, १५१, १५२, १५३, सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम १९८४ च्‍या कलम ३,४, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्‍टच्या कलम ७ सह महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ व १४० नुसार जिन्‍सी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या दंगलीत सहभागी असलेल्या आरोपींना शोधण्यासाठी गुन्हे शाखेसह इतर आठ पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी गुरुवारी दिवसभरात आठ जणांचा शोध घेऊन अटक केली. त्याशिवाय २० ते २५ आरोपींची ओळख पटवली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दंगलीत सहभागी असलेल्यांच्या नावांची ओळख पटवण्यात येत आहे.

दंगलीच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन

पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी या दंगलीच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सात पोलिस अधिकारी आणि तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष तपास पथक या दंगलीची चौकशी करणार आहे.

पोलिस आयुक्तांनी स्थापन केलेल्या या विशेष तपास पथकात जिन्सीचे सहायक निरीक्षक अनिल मगरे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, सायबरचे राहुल चव्हाण, सिटीचौकचे रोहित गांगुर्डे, मुकुंदवाडीचे बाळासाहेब आहेर, वेदांतनगरचे उत्तरेश्वर मुंडे यांच्यासह अरुण वाघ, संजय गावंडे आणि सुनील जाधव या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आठ आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या आठ आरोपींना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांच्यासमोर हजर केले असता त्यांना या आठही आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

यापैकी सहा आरोपींना गुरुवारच्या रात्री तर दोन आरोपींना आज शुक्रवारी दुपारी एक वाजेच्‍या सुमारास अटक करुन न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. सुनावणीवेळी गुन्‍हा गंभीर असून आरोपींनी गुन्‍हा करतेवेळी वापरलेल्या लाठ्या-काठ्या आणि सळया हस्‍तगत करायच्‍या आहेत. आरोपींच्‍या साथीदार कोण आहेत याचा तपास करुन त्‍यांना अटक करायची आहे. गुन्‍हा करण्‍यामागे नेमका काय हेतू होता. याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील आमेर काजी आणि तपास अधिकारी सहायक निरीक्षक ए.बी. मगरे यांनी न्‍यायालयाकडे केली.

आम्हीच आरोपी कशावरुन?

पाचशे ते सहाशे जमावामधून आम्हीच आरोपी होतो हे कशावरून ओळखले? यात आरोपींचा सहभगा नाही. आरोपींकडून गुन्‍ह्यात वापरलेले कोणतेच हत्‍यार हस्‍तगत करण्‍यात आलेले नाही. आरोपींवर विनाकारण बिनबुडाचे आरोप करण्‍यात आले आहेत. कोणत्‍या गुन्‍ह्याखाली कोणत्‍या आरोपीला अटक केली याची माहिती नाही. त्‍यामुळे आरोपींची पोलfस कोठडीत रवानगी न करता त्‍यांना न्‍यायालयीन कोठडी देण्‍यात यावी अशी विनंती आरोपींच्‍या वतीने करण्‍यात आली. पोलिसांचा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने आठही आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!