नाशिकः नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथील एका खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडीवऱ्हे पोलिसात वसतिगृहाचे संस्थाचालक आणि शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे एका खासगी संस्थेमार्फत कायम विनाअनुदान तत्वावर इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा चालवली जाते. या शाळेला जोडूनच यावर्षीपासून मुलींसाठी वसतिगृहही सुरू करण्यात आले आहे.
नियमाप्रमाणे शाळा सुरू होण्यास पंधरा दिवसांचा अवधी असताना इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना ३१ मेपासूनच वसतिगृहात प्रवेश देण्यात आला. सुट्यांमध्ये मुलींना पारंपरिक नृत्य आणि संगणकाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेमार्फत सांगण्यात आले होते. त्यामुळे या मुलींनी शाळा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीच वसतिगृहात प्रवेश घेतला होता.
संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर हॉटेल असून या टेकडीवर मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या विद्यार्थिनींना या पर्यटकांसमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत नाचण्यास सांगितले जाते. मुली नाचल्या नाही तर संस्थाचालकांच्या सांगण्यावरून शिक्षिका दमदाटी करतात आणि छड्या मारतात, अशी तक्रार या मुलींनी पालकांकडे केली.
पारंपरिक नृत्य आणि संगणकाचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली पंधरा दिवस आधीच वसतिगृहात प्रवेश करवून घेतलेल्या आपल्या मुलींकडून असा प्रकार करवून घेत असल्याच्या तक्रारी खुद्द मुलींकडूनच ऐकल्यानंतर पालक संतप्त झाले आणि त्यांनी आपल्या मुलींना घरी नेले. वसतिगृहात संगणक प्रशिक्षणच दिले नसल्याचीही या मुलींची तक्रार आहे.
या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी आपल्या पालकांकडे तक्रार केल्यानंतर संतापलेल्या पालकांनी १८ जून रोजी वाडीवऱ्हे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संस्थेचे संचालक आणि शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.