राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही एक पुन्हा एकत्र येणार, खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्ट संकेत; म्हणाले…


सोलापूरः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवारांचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाली. त्या भेटीवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात असतानाच ही भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचा भाग होती, हे आज स्पष्ट झाले आहे. आमच्यातील ज्या सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांच्यात काही परिवर्तन होते काय? यासाठी हितचिंतकांकडून प्रयत्न सुरू असून ते सुसंवाद घडवत आहेत, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या आहेत.

शरद पवार हे आज रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शनिवारी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली. या बैठकीबाबत कालपासून वेगवेगळे राजकीय तर्क लावले जात आहे. अजित पवारांनी शरद पवारांनाच सोबत येण्याची गळ घातल्याची चर्चाही होत आहे. परंतु शरद पवार यांनीच आज ही भेट राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाच्या एकत्रिकरणाच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

आमच्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का, असा प्रयत्न आमचे हितचिंतक करतात. त्यामुळे ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत, असे शरद पवार म्हणाले. याचाच अर्थ अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आणि शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट यांना एकत्र आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचेच स्पष्ट होत आहे.

हेही वाचाः वडिलकीच्या नात्याने अजित पवारांना भेटलो, भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाहीः शरद पवारांचे स्पष्टीकरण

 अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये २ जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. अजित पवारांच्या नेतृत्वातील गटाने शरद पवारांचे मन वळवून त्यांनाही सोबत येण्यासाठी गळ घातल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू होत्या. त्यात शनिवारच्या गुप्त भेटीमुळे भरच पडली. परंतु या चर्चा शरद पवारांनी फेटाळून लावल्या.

भाजपबरोबर युती करणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणात बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपबरोबर जाणार नाही. भाजप ही विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी भाजपसोबत जाणार नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

वेगळी भूमिका घेऊन भाजपसोबत गेलेल्या सहकाऱ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सुसंवाद सुरू असल्याचे शरद पवार म्हणाले. आम्ही एकत्र असो, होतो किंवा यापुढे एकत्र असू तेव्हाही भाजप ही विचारधारा आमच्या चौकटीत बसणार नाही, असे पवार म्हणाले.

अजित पवारांशी पुण्यातील भेटीबाबत शरद पवार म्हणाले की, अजित पवार माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितले तर पवार कुटुंबात आता वडील माणूस मीच आहे. वडील माणसाला कोण भेटायला आले आणि वडील माणसाने कोणाला भेटायला बोलावले हा चर्चेचा विषयच होऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.

गेलेले लोक दुःखी, दुसऱ्यामार्फत सांगतात…

आम्ही जेव्हा एकत्र होतो किंवा पुढे एकत्र येऊ पण भाजप ही विचारधारा आणच्या चौकटीत बसत नाही. काही लोक भेटतात. काही लोक दुःखी आहेत. जे लोक गेले ते दुसऱ्या लोकांमार्फत सांगतात की झालं गेलं सांभाळून घ्या, असेही शरद पवार म्हणाले. २०२४ रा राज्याची जनता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  यांच्या नेतृत्वातील आघाडीच्या हातात सत्तेची सूत्रे देईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

सत्ताधाऱ्यांची फोडाफोडी लोकांना अमान्य

मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे ३० ते ४० नेते उपस्थित राहतील. या बैठकीचे आयोजन मी स्वतः, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी केले आहे. दोन बैठका झाल्या आहेत. आता काही प्रश्न घेऊन चर्चा करण्याची गरज आहे. त्यामुळे मुंबईतील बैठक महत्वाची आहे. इंडिया आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. सत्ताधारी फोडाफोडी करतोय, हे लोकांना पसंत पडत नाही. सामान्य लोक मतदानाच्या वेळी निर्णय करतील, असे शरद पवार म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!