पुणेः भल्या पहाटे पाच वाजता दोन पुरूष शपथविधी उरकतात, मग आम्ही बायकांनी पहाटे उठून सडा-सारवण आणि रांगोळ्याच काढायच्या का? असा थेट आणि तिखट सवाल एका तरूणीने सासंदीय राजकारणात तब्बल ५५ वर्षे कारकीर्द गाजवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. त्यावर शरद पवार खळखळून हसले.
पुण्यातील स्वोजस पॅलेस येथे शनिवारी संभाजी ब्रिगेडच्या केडर कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, आ. रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी- सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात शरद पवारांनी समाजकारण आणि अर्थकारणावरील प्रश्नांसदर्भात तरूणांना मार्गदर्शन केले. त्यांच्याशी संवाद साधला आणि कार्यकर्त्यांना प्रश्न विचारायला लावून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
प्रश्नोत्तराच्या वेळी अमरावती जिल्ह्यातून आलेल्या क्षिप्रा मानकर या तरूणीने महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? असा सवाल करत चांगलीच फटकेबाजी केली. जिजाऊ, रमाई, सावित्री, रखमाबाई राऊत, तानुबाई बिर्जे, झलकारीबाई, मुक्ता साळवे यांच्यापासून महाराष्ट्र भूमीला न्याय देण्यासाठी अनेक महिलांनी खस्ता खाल्ल्या. महाराष्ट्र निर्मितीसाठी एवढ्या महिलांनी भरीव योगदान देऊनही कित्येक सत्ता आल्या आणि गेल्या, पण इथल्या सत्ताधाऱ्यांना एकदाही महाराष्ट्रभूमीला महिला मुख्यमंत्री द्यावीशी वाटली नाही, त्याचे कारण काय? असा थेट आणि तिखट सवाल या तरूणीने विचारला.
या थेट आणि निर्भिड सवालावर शरद पवार यांनी स्मितहास्य करून कानाला हात लावला आणि तरूणीची माफी मागितली. पण उत्तर देताना त्यांनी स्वतःच आखलेल्या महिला धोरणाची माहिती दिली. आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्रिपदी बसली नाही, हे खरे आहे. परंतु महिलांना विविध क्षेत्रात कायद्याने अधिकार मिळाला पाहिजे, यासाठीचे देशातील पहिले महिला धोरण महाराष्ट्रात राबवले गेले. त्याचा परिणाम नक्की झाला, असे शरद पवार म्हणाले. आतापर्यंत आपण निम्मे अंतर गाठले, आता पुढचे अंतर आपल्याला गाठावे लागणार आहे. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आम्हा लोकांना तसे निर्णय घ्यावे लागतील आणि तसे निर्णय घेण्याची जबाबदारी आमची असेल, असे पवार म्हणाले.
शरद पवारांच्या या उत्तरानंतरही क्षिप्रा मानकर या तरूणीने संधी साधली. भल्या पहाटे पाच वाजता दोन पुरूष शपथविधी उरकतात, मग आम्ही पहाटे उठून सडा-सारवण आणि रांगोळ्याच काढायच्या का? असा तिखट सवाल तिने केला. त्यावर पवार खळखळून हसले. महिलांना संधी दिली की त्या भरारी घेतात. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी महिला बसेल, हे नक्की आपल्याला सर्वांना दिसेल, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी संघटन बांधणी या विषयावर चर्चा केली. राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी उद्योजकता आणि आर्थिक शिस्त याविषयावर माहिती दिली. सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सारथी संस्थेच्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली.