सोलापूरः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवार नऊ आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाल्यानंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाली. त्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच आज रविवारी शरद पवार यांनीच या भेटीबाबत खुलासा केला. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने मी अजित पवारांना भेटलो, असे पवार म्हणाले. भाजपसोबत जाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय धोरणात बसत नाही, असे सांगत त्यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवरही पूर्णविराम दिला.
पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी शनिवारी झालेल्या भेटीवरून राजकीय काहूर उठले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले की, अजित पवार माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितले तर पवार कुटुंबात आता वडील माणूस मीच आहे. वडील माणसाला कोण भेटायला आले आणि वडील माणसाने कोणाला भेटायला बोलावले हा चर्चेचा विषयच होऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले की, भाजपबरोबर युती करणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणात बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का, असा प्रयत्न आमचे हितचिंतक करतात. त्यामुळे ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपबरोबर जाणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
गेलेले लोक म्हणतात, झालं गेलं सांभाळून घ्या!
आम्ही जेव्हा एकत्र होतो किंवा पुढे एकत्र येऊ पण भाजप ही विचारधारा आणच्या चौकटीत बसत नाही. काही लोक भेटतात. काही लोक दुःखी आहेत. जे लोक गेले ते दुसऱ्या लोकांमार्फत सांगतात की झालं गेलं सांभाळून घ्या, असेही शरद पवार म्हणाले. २०२४ रा राज्याची जनता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नेतृत्वातील आघाडीच्या हातात सत्तेची सूत्रे देईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
फोडाफोडी लोकांना पसंत नाही
मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे ३० ते ४० नेते उपस्थित राहतील. या बैठकीचे आयोजन मी स्वतः, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी केले आहे. दोन बैठका झाल्या आहेत. आता काही प्रश्न घेऊन चर्चा करण्याची गरज आहे. त्यामुळे मुंबईतील बैठक महत्वाची आहे. इंडिया आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. सत्ताधारी फोडाफोडी करतोय, हे लोकांना पसंत पडत नाही. सामान्य लोक मतदानाच्या वेळी निर्णय करतील, असे शरद पवार म्हणाले.