बाबासाहेबांच्या पीईएसमध्ये संघाचा ‘ऍनाकोंडा’, संस्थेच्या सदस्यपदी दोन भाजप समर्थकांची वर्णी; ‘महाउपासका’कडून ‘रेशीम’ उपासना?


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर (पीईएस) आता राष्ट्रीय स्वयंसेवक (आरएसएस) आणि भाजपचे नियंत्रण पहायला मिळवण्याची शक्यता आहे. संस्थेच्या सदस्यपदी भाजपचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील माजी आमदार श्रीकांत जोशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू निवृत्त सनदी अधिकारी तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील पायाभूत सुविधा प्रकल्प वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांची वर्णी लावण्यात आली आहे.

बौद्ध धम्म चळवळीत आपले खूपच मोठे योगदान असल्याचे सांगून ‘महाउपासक’ अशी बिरूदावली मिरवणारे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑगस्ट रोजी मिलिंद महाविद्यालयात झालेल्या संस्थेच्या केंद्रीय विशेष सभेत ठरवून पीईएसमध्ये संघाचा ऍनाकोंडा घुसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी २७ जुलै रोजी झालेल्या विशेष सभेत पीईएसच्या सदस्यपदी भाजपचे माजी आमदार श्रीकांत जोशी, मुख्यमंत्री सचिवालयातील पायभूत प्रकल्प वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, निवृत्त सनदी अधिकारी विश्वनाथ शेगावकर, सी.आर. सांगलीकर, बी. शीलाराणी, निवृत्त सनदी अधिकारी आणि औरंगाबादचे माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर या सहा जणांच्या नावांवर चर्चा करण्यात आली होती. १० ऑगस्ट रोजी झालेल्या विशेष सभेत या सहाही जणांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा उद्देश केवळ शिक्षण देणे नाही तर बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक लोकशाही चालना मिळेल अशा पद्धतीने शिक्षण देणे आहे. आधुनिक भारताची हीच गरज आहे आणि भारताच्या सर्व हितचिंतकांनी याचा प्रचार केला पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेच्या वेळी म्हणाले. त्यामुळे बाबासाहेबांच्या पश्चात पीईएसची धुरा सांभाळणाऱ्यांनी बाबासाहेबांचा हा दृष्टिकोन जोपासणे अनिवार्य होते, परंतु तसे झाले नाही.

गेल्या काही वर्षांपासून पीएसई सोसायटीतील अंतर्गत वादामुळे आधीच संस्थेची अनेक महाविद्यालये गलितगात्र झाली आहेत. संस्थेवर ताबा कुणाचा? यावरून संस्थेत वर्चस्वाची लढाई सुरू झाली आणि गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले आहे.

एकेकाळी पीईएसच्या ज्या महाविद्यालयांत प्रवेशासाठी एकेकाळी झुंबड असायची, आजघडीला त्या महाविद्यालयातील अर्ध्याअधिक जागा रिक्तच रहात आहेत. संस्थेत वशीलेबाजी करून केलेल्या प्राध्यापकांच्या नियुक्त्या आणि त्यामुळे ढासळलेली गुणवत्ता यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे संस्थेचे हितचिंतक सांगतात.

पीईएसच्या व्यवस्थापनात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या वर्चस्वाच्या याच लढाईचा फायदा घेत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएसः आणि भाजपने पीईएसमध्ये घुसखोरी केली आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात पीईएसच्या व्यवस्थापनावर आरएसएस-भाजपचे नियंत्रण असलेले पहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातून पीईएसची जी महाविद्यालये परिवर्तनवादी चळवळीची केंद्रे म्हणून नावारुपाला आली होती, त्या महाविद्यालयांत आता वैदिक गणित आणि अंक ज्योतिष्यशास्त्रासारखे अभ्यासक्रमही शिकवले जाण्याची भीती पीईएसच्या हितचिंतकांना वाटू लागली आहे.

‘रेशीम’ दबाव की ‘महाउपासका’कडून स्वतःच उपासना?

२०१४ मध्ये देशात भाजपची सत्ता आल्यापासून परिवर्तनवादी, पुरोगामी आणि उदारमतवादी विचाराला खतपाणी घालणाऱ्या शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न आरएसएस आणि भाजपकडून सुरू आहेत. दिल्लीच्या जेएनयूमध्ये घडवून आणलेल्या नाट्यापासून सुरू झालेले हे प्रयत्न पुढे देशभरातील अन्य संस्थांतही सुरू झाले आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून पीईएसवरील भाजपचे माजी आमदार श्रीकांत जोशी आणि राधेश्याम मोपलवार यांच्या नियुक्तीकडे पाहिले जात आहे.

श्रीकांत जोशी आणि राध्येश्याम मोपलवार यांची पीईएसच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात यावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष ‘महाउपासक’ डॉ. एस.पी. गायकवाड यांच्यावर आरएसएस-भाजपकडून दबाव होता की डॉ. गायकवाड यांनीच स्वतःहोऊन रेशीमबागेच्या उपासनेचा मार्ग चोखाळत जोशी-मोपलवारांची नियुक्ती केली? असा सवाल पीईएसच्या हितचिंतकांकडून केला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!