नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि २००२ च्या गुजरात दंगलीतील त्यांच्या भूमिकेवर बेतलेल्या ‘इंडियाः द मोदी क्वेशन’ या बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीचे आज सायंकाळी सहा वाजता जामिया मिल्लिया इस्लामियामध्ये प्रसारण करण्यात येईल. एसएफआय या डाव्या विद्यार्थी संघटनेच्या जामिया शाखेने ही घोषणा करून त्याबाबतचे पोस्टरही जारी केले आहे. जामिया प्रशासनाने या डॉक्यूमेंट्रीच्या प्रशासनावर बंदी घातली आहे. या घोषणेनंतर दिल्ली पोलिसांनी एसएफआयच्या किमान चार विद्यार्थी नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
जामिया परिसरात दिल्ली पोलिसांची रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. जेएनयूनंतर आता जामियामध्ये या डॉक्यूमेंट्रीच्या प्रसारणावरून संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बीबीसीच्या या बहुचर्चित डॉक्यूमेंट्रीवर देशव्यापी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये २७ जानेवारीला या डॉक्यूमेंट्रीचे प्रसारण होणार आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि माकपने या डॉक्यूमेंट्रीचे सार्वजनिक प्रसारण केले आहे.
बीबीसीने तयार केलेली ‘इंडियाः द मोदी क्वेशन’ ही डॉक्यूमेंट्री यूट्यूब चॅनल्स आणि ट्विटरवर शेअर करण्यास मोदी सरकारने बंदी घातली आहे. परंतु सरकारने या डॉक्यूमेंट्रीवर बंदी घातलेली नाही. जर मोदी सरकारने बंदीची घोषणा केली तरच कायदेशीरदृष्ट्या लोकांना ही डॉक्यूमेंट्री पाहण्यापासून रोखले जाऊ शकते.
परंतु अधिकृत बंदी न घालता लोकांना ती पाहण्यापासून रोखण्याचा सरकारचा इरादा जेएनयू आणि जामिया मिल्लियासारख्या केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आधीच ओळखून घेतला आहे. जेएनयूमध्ये मंगळवारी रात्री जेएनयू छात्र संघाने ही डॉक्यूमेंट्री दाखवण्याची घोषणा केली होती. परंतु जेएनयू प्रशासनाने कॅम्पस आणि हॉस्टेलचा विद्युत पुरवठा खंडित करून टाकला. विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर जेथे विद्यार्थी जुगाड करून ही डॉक्यूमेंट्री पहात होते, तेथे आरएसएसशी संबंधित एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनेने दगडफेक केल्याचा आरोप आहे.
जामियाच्या एसएफआय शाखेने या डॉक्यूमेंट्रीच्या प्रसारणाबाबतचे पोस्टर आज बुधवारी सकाळीच जारी केले. त्यानुसार आज सायंकाळी ६ वाजता जामियाच्या एमसीआरसी विंगमध्ये ‘इंडियाः द मोदी क्वेशन’ ही डॉक्यूमेंट्री दाखवली जाईल. एमसीआरसी विंगमध्ये जामियाचा मास कम्युनिकेशन पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. एसएफआयच्या घोषणेनंतर लगेच दिल्ली पोलिस सक्रीय झाले. मात्र पोलिसांनी त्याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
एसएफआयच्या जामिया शाखेचे नेते अजीज, निवेद्या, अभिराम आणि तेजस या विद्यार्थी नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ एसएफआयने जामियाच्या गेट नंबर ७ वर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.
कोलकोत्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये २७ जानेवारीला दुपारी ४ वाजता या डॉक्यूमेंट्रीचे प्रसारण केले जाणार आहे. एसएफआयने या प्रसारणासाठी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. प्रेसिडेन्सी कॉलेज परिसरातील बॅडमिंटन कोर्ट बुक करण्यासाठी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना ईमेल पाठवण्यात आला आहे. येथे एका मोठ्या स्क्रीनवर ही डॉक्यूमेंट्री दाखवली जाईल, असे एसएफआयच्या वतीने सांगण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.
संपूर्ण केरळमध्ये काल मंगळवारी काँग्रेस, माकप आणि एसएफआयने बीबीसीची ही डॉक्यूमेंट्री सार्वजनिकरित्या दाखवली. स्क्रीनिंगच्या विरोधात भाजयूमोच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करावा लागला.