पूर्व लडाखच्या २६ पेट्रोलिंग पॉइंटवर भारतीय लष्कराने पोहोच गमावली, गस्तही नाहीः रिपोर्ट

नवी दिल्लीः ‘हमारी सीमा में न घुसा था और घुसा है’  असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत आश्वस्त केले असतानाच एक धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. पूर्व लडाखमध्ये असलेल्या ६५ पट्रोलिंग पॉइंट्सपैकी २६ पेट्रोलिंग पॉइंट्सवर भारतीय लष्कर आता गस्त घालत नसल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. याचाच अर्थ भारतीय लष्कर सीमेवर गस्त घालण्याच्या २६ जागांवर आता गस्त घालू शकत नाही आणि हे भाग कथित रित्या चीनमध्ये गेले आहेत. ‘द हिंदू’ने दिलेल्या विशेष वृत्तात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला असून या संबंधित दस्तऐवज पाहिल्याचा दावाही ‘द हिंदू’ने केला आहे. त्यावरून भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘हमारी सीमा में न कोई घुसा था और घुसा है’ या जुमल्याची आठवणही दिली आहे.

 दिल्लीमध्ये मागील आठवड्यात झालेल्या वार्षिक पोलिस बेठकीत सादर करण्यात आलेले रिसर्च पेपर ‘द हिंदू’ने पाहिले आहेत. पूर्व लडाखमधील ६५ पैकी २६ पेट्रोलिंग पॉइंटपर्यंत भारताची पोहोच संपुष्टात आली आहे. पुढच्या क्षेत्रात जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकांना ये-जा करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मीशी (पीएलए) संघर्ष टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पेट्रोलिंग पॉइंट १५ आणि १६ वर नुकत्याच झालेल्या समझोत्याचा परिणाम म्हणून गोगरा टेकड्या, पैंगोंग त्सोचा उत्तर किनारा आणि काकजंग क्षेत्रातील कुरण जमिनीचे नुकसान झाले आहे, असे ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

२० ते २२ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) वार्षिक पोलिस महासंचालक (डीजीपी) परिषदेत हा रिसर्च पेपर चर्चेसाठी आला नाही. या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले होते. वस्तुतः हे पेपर देशभरातील पोलिस अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘कुंपण नसलेल्या जमिनीच्या सीमेशी संबंधित सुरक्षा मुद्दे’ या विषयावर सादर केलेल्या १५ रिसर्च पेपरपैकी एक होता, असे ‘द हिंदू’ने या वृत्तात म्हटले आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) पूर्व लडाखमधील कमीत कमी ३० पेट्रोलिंग पॉइंट असे आहेत की तेथे आता भारतीय लष्कर गस्त घालत नाहीत, असे वृत्त यापूर्वी ‘द हिंदू’ने २२ डिसेंबर २०२२ रोजी दिले होते.

 या पेट्रोलिंग पॉइंटवर एप्रिल-मे २०२० पूर्वी नियमितरित्या गस्त घालण्यात येत होती. त्यावेळी चीनने एलएसीजवळ सैनिकांची जमवाजमव सुरू केली होती. १५ जून २०२० रोजी पीएलएसोबत झालेल्या हिंसक संघर्षात २० भारतीय सैनिक शहीद झाले होते तर चीनचे किमान चार सैनिक मारले गेले होते.

‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार, या रिसर्च पेपरमध्ये म्हटले आहे की, ‘विद्यमान परिस्थितीत, काराकोरम दर्रेपासून चुमूरपर्यंत ६५ पेट्रोलिंग पॉइंट (पीपी) आहेत, ज्यांच्यावर आयएसएफद्वारे (भारतीय सुरक्षा बल)’ नियमित गस्त घातली जाणे आहे. ६५ पीपीपैकी २६ पीपी ( म्हणजे पीपी नंबर ५-१७,२४-३२,३७,५१,५२,६२) आपली स्थिती आयएसएफद्वारे गस्ती घालण्यात येत नसल्यामुळे संपुष्टात आली आहे. नंतर, अशा भागात दीर्घ काळापर्यंत आयएसएफ किंवा भारीय नागरिकांची उपस्थिती पाहिली गेली नाही, परंतु या क्षेत्रात चीनी तैनात होते, हे तथ्य  स्वीकारण्यास आम्हाला चीनने बाध्य केले आहे’.

 इंच इंच जमीन हडपण्याच्या पीएलएच्या या रणनितीला ‘सलामी स्लायसिंग’ या नावाने ओळखले जाते.

एका सुरक्षा सूत्राने ‘द हिंदू’ला सांगितले की, पूर्व लडाखमध्ये एलएसीवर फिजिकल गस्त अथवा तांत्रिक साधने भक्कम आहे. डिसएंगेजमेंटमुळे क्षेत्राचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काही क्षेत्रात वादामुळे राजनैतिक तोडगा निघेपर्यंत दोन्ही पक्षांनी गस्तीसाठी प्रतिबंध केला आहे. वादग्रस्त सांगितल्या जात असलेल्या क्षेत्रावर आक्षेप घेण्याची संधी देऊन पीएलएला नाराज करायचे नाही, ही भारताची सुरक्षा रणनिती आहे, असे या सूत्राचे म्हणणे आहे.

सप्टेंबर २०२१ पर्यंत जिल्हा प्रशासन आणि सुरक्षा बलाचे वरिष्ठ अधिकारी डीबीओ सेक्टरमधील काराकोरम दर्रे (दौलतबेग ओल्डीपासून ३५ किलोमीटर) पर्यंत सहजपणे गस्त घालत होते. काराकोरम दर्रेच्या बाजूने डीबीओमध्ये डिसेंबर २०२१ मध्ये पीएलएने कॅमेरे लावले होते, असे ‘द हिंदू’ने म्हटले आहे.

सुब्रह्मण्यम स्वामींचा हल्लाबोलः ‘द हिंदू’च्या या वृत्तावरून भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. ‘धाडसी सरकारी अधिकाऱ्यांनी खुलासा केला आणि धाडसी ‘द हिंदू’ने त्याची पुष्टी केली (आजच्या आवृत्तीत). मी काय म्हणत होतोः  कोई आया नाहीं… असे जेव्हा मोदी म्हणत होते तेव्हा त्यांनी भारतीयांना फसवले. मोदी सरकारने ६५ पैकी २६ पेट्रोल पॉइंट चीनला आत्मसपर्मित (पोहोच गमावली) करून टाकले आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे’, असे ट्विट सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *