खासदार फोडाफोडीच्या धास्तीने लोकसभा अध्यक्षपदावर टीडीपी-जेडीयूचा डोळा, २५ वर्षांपूर्वींच्या घटनेमुळे भाजपच्या पोटात मात्र गोळा!


नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा लोकसभा अध्यक्षपदाकडे लागल्या आहेत. युती- आघाड्यांचे सरकार चालवताना अतिशय महत्वाची आणि निर्णायक भूमिका असलेले लोकसभा अध्यक्षपद आपल्याला मिळावे यासाठी चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी आणि नितीश कुमार यांचा जेडीयू आग्रही आहे. मात्र २५ वर्षांपूर्वी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णायक भूमिकेमुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार कोसळले होते. त्या घटनेच्या पुनरावृत्तीच्या धास्तीने भाजपच्या पोटात मात्र गोळा उठला आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपद आपल्याकडे रहावे, यासाठी भाजपही आग्रही आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले असले तरी यावेळच्या सरकारची परिस्थिती वेगळी आहे. मोदींचे हे सरकार टीडीपी आणि जेडीयूच्या टेकूवर उभे आहे. भाजपकडे यावेळी २४० खासदार आहेत. बहुमताचा आकडा २७२ आहे. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयींचे सरकार केवळ एका मताने पडले होते. त्यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री बनलेले काँग्रेसचे खासदार गिरीधर गमांग यांना लोकसभा अध्यक्षांनी मतदानाची परवानगी दिली होती. त्यावेळी टीडीपीचे बालयोगी हे लोकसभा अध्यक्ष होते.

आता पुन्हा एकदा टीडीपी भाजपसोबत सत्तेत आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्षपदावर दावा केला आहे. २५ वर्षांपूर्वी चंद्राबाबू नायडूंसोबत आलेला कटू अनुभव पाहता भाजपकडून लोकसभा अध्यक्षपद त्यांना दिले जाण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे जेडीयूनेही या पदावर दावा केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्षपद टीडीपी किंवा जेडीयूला देण्याची जोखीम पत्करणार नाहीत, अशीच शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

आंध्रप्रदेशात आज टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्यासाठी हजर राहणार आहेत. त्यावेळी तेथे लोकसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा होऊ शकते. मोदींच्या कॅबिनेटमध्ये टीडीपी आणि जेडीयूच्या कोट्यातील मंत्रिपदांबाबत अद्याप कोणत्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत, त्यामुळे मोदीच्या गोटात दिलासादायक वातावरण अनुभवले जात आहे.

लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपी, जेडीयूने आपले पत्ते अद्याप उघडलेले नसले तरी त्यांच्या गोटातून ज्या बातम्या येत आहेत, त्यातून या दोन्ही पक्षांचा डोळा लोकसभा अध्यक्षपदावर असल्याचे दिसून येऊ लागले आहे.  आघाडी- युतीच्या सरकारमध्ये संतुलन राखण्यासाठी प्रत्येक पक्षाला आपलाच व्यक्ती लोकसभा अध्यक्षपदी हवा असतो. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून कोणतीही गडबड होऊ नये, असा भाजपचा प्रयत्न आहे.

टीडीपी, जेडीयूला फोडाफोडीची धास्ती

भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचा घटकपक्ष असलेल्या टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षाला भाजपकडून खासदार फोडाफोडीची धास्ती आहे. लोकसभा अध्यक्षपद भाजपकडे गेले तर भाजप कधीही आपल्या पक्षातील खासदार फोडून त्यांना आपलेसे करून घेऊ शकते. जर लोकसभा अध्यक्ष टीडीपी किंवा जेडीयूचा बनला तर भाजपला खासदार फोडाफोडीचा प्रयत्न करता येणार नाही, अशी जेडीयू आणि टीडीपीची भावना आहे.

इंडिया आघाडीकडूनही प्रयत्न

विरोधी इंडिया आघाडीनेही लोकसभा अध्यक्षपद मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इंडिया आघाडी लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवू शकते. तसे झाले तर अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. १८ व्या लोकसभेत इंडिया आघाडीकडे २३२ खासदार आहेत तर एनडीएकडे २९३ खासदार आहेत. त्यातील २४० खासदार भाजपचे आहेत. इंडिया आघाडीच्या मदतीने टीडीपी किंवा जेडीयूकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार गुपचुप किंवा उघडपणे मैदानात उतरवला जाण्याचीही शक्यता आहे.

पुरंदेश्वरींच्या नावावर मतैक्याची शक्यता

लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच कायम राहिले तर ओम बिर्ला हेच या पदाचे दावेदार असू शकतात. बिर्ला हे राजस्थानच्या कोटा मतदारसंघाचे खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षपदासाठी जी अन्य नावे चर्चेत आहेत, त्यात दग्गुबाती पुरंदेश्वरी यांच्याही नावाचा समावेश आहे. टीडीपीचे संस्थापक एन.टी. रामाराव यांच्या कन्या असलेल्या पुरंदेश्वरी आंध्रप्रदेशातील भाजप नेत्या आहेत. त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यांना टीडीपी आणि इंडिया आघाडीचाही पाठिंबा मिळू शकतो.

 पुरंदेश्वरी यांनी २००९ मध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्री आणि २०१२ मध्ये वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात काम केले आहे. राजमुंदरी लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. लोकसभा अध्यक्षपदासाठी मैदानात उतरवण्यासाठीच कदाचित भाजपने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केलेला नसावा. पुरंदेश्वरी लोकसभा अध्यक्ष बनल्या तर टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूही नाराज होणार नाहीत. कारण चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी आणि पुरंदेश्वरी या सख्ख्या बहिणी आहेत.

भाजपचा लोकसभा अध्यक्ष घातक-आप

तिकडे इंडिया आघाडीचा घटकपक्ष असलेल्या आम आदमी पार्टीने लोकसभा अध्यक्षपदाबाबत सूचना केली आहे. एनडीए सरकारमध्ये टीडीपीचा लोकसभा अध्यक्ष बनला पाहिजे. भाजपचा लोकसभा अध्यक्ष संसदीय परंपरांसाठी घातक ठरेल. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात १५० खासदारांना निलंबित करण्यात आले होते. हे लोक सत्तेत टिकून राहण्यासाठी छोट्या पक्षात फोडाफोडी करू शकतात, असे आपचे नेते खा. संजय सिंह यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!