विधिमंडळ अधिवेशनात विरोधात प्रश्न, लक्षवेधी न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटांकडून पैश्यांची मागणी, भाजप आमदाराचा खळबळजनक आरोप


मुंबईः सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सुरू असतानाच विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैश्यांचा व्यवहार करण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा सत्ताधारी भाजपच्या आमदाराने केला आहे. विधानसभेत विरोधात प्रश्न लावू. प्रश्न लावायचा नसेल तर पैसे द्या, असे ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या एजंटांकडून केले जात आहे, असा आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे.

विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न लावण्यासाठी, लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैश्यांचे व्यवहार होत आहेत, असा दावा आ. फुके यांनी बुधवारी विधान परिषदेत बोलताना केला. फुके यांनी यासंदर्भातील ऑडिओ क्लिपही सादर केली आहे. विधानसभेत प्रश्न का लावयचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल, याबाबतच्या धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहेत. आ. फुके यांनी हा ‘एजंट बॉम्ब’ फोडून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिलधारकांवर त्यांनी केलेल्या चुकांमुळे राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली होती. त्या कारवाया परत करण्याची धमकी देऊन परत लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू, तुमची राईस मिल आम्ही बंद करू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा प्रकारच्या धमक्या देऊन राईस मिलधारकांकडून पैश्यांची मागणी करण्यात आली, असे आ. फुके म्हणाले.

२०२३ मध्ये तत्कालीन मंत्र्याने याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. मी प्रामुख्याने तीन-चार राईस मिलबाबत सांगतोय. या कारखान्यांना घोटाळ्यांच्या आरोपांतून क्लीन चीट देण्यात आली आहे. काल विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला. हा प्रश्न उपस्थित करण्याच्या दोन दिवस आधीची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे, असे आ. फुके म्हणाले.

काही एजंट्स राईस मिलच्या कार्यालयात गेले होते. तेथे यासंदर्भातील प्रश्न विधानसभेत लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल, अशा धमक्या देण्यात आल्या. त्याची व्हिडीओ क्लिपदेखील माझ्याकडे आहे. या संदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आ. परिणय फुके यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते व एजंट असा गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. हे लोक कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे योगेश कदम म्हणाले.

कोणी ब्लॅकमेल करत असेल, व्यवस्थेचा गैरफायदा घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. या घटनेचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्री यावर चर्चा करणार आहेत. दोन्ही सभागृहातील सदस्यांशी ते बोलतील. ज्यांच्याकडे याविषयीची माहिती असेल त्यंनी एकत्रितपणे आपापले मुद्दे उपमुख्यमंत्र्यांकडे मांडावेत. या बैठकीला आम्ही आ. परिणय फुके यांनाही बोलवू, असे कदम म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना ऐकवल्या ऑडिओ, व्हिडीओ क्लिप

एका नेत्याच्या उजव्या हाताची ऑडिओ क्लिप तर डाव्या हाताची व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे. विधान परिषदेतील लक्षवेधी सुरू होण्याच्या आधी मला राईस मिलधारकांनी ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप पाठवल्या. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप दाखवल्या. याबाबत सभागृहाला माहिती द्या. जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत कोणचेही नाव घेऊ नका, असे मला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे आ. परिणय फुके यांनी नंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!