चिंचवड, कसबापेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या, निवडणूक आयोगाने जाहीर केले नवीन वेळापत्रक

नवी दिल्लीः महाराष्ट्र विधानसभेच्या चिंचवड आणि कसबापेठ पोटनिवडणुकीच्या तारखांमध्ये निवडणूक आयोगाने बदल केला आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या इयत्ता बारावी व पदवीच्या परीक्षा आणि मतदानाच्या तारखा एकाच काळात येत असल्याचे कारण देत या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने याआधी जाहीर केलेल्या तारखांनुसार चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते आणि २ मार्च रोजी मतमोजणी करून निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार होते. अरूणाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमधील विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागांबरोबरच चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचीही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.

मात्र चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीच्या तारखांना  इयत्ता बारावी आणि पदवीच्या परीक्षा घेण्यात असल्याचे पुण्याच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने निवडणूक आयोगाला कळवल्यामामुळे या तारखांत बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षांचे जाहीर केलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा आणि पुणे विद्यापीठाच्या पदवी परीक्षा  चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रावर घेण्यात येत असल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने या तारखांमध्ये बदल करून या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.

पोटनिवडणुकीचे नवीन वेळापत्रक असेः निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार चिंचवड आणि कसबापेठ पोटनिवडणुकीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी होईल. ७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. ८ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छानणी होईल. १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील आणि २६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही मतदारसंघात मतदान घेण्यात येऊन २ मार्च रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!