पीईएसमध्ये ‘आरएसएस’च्या घुसखोरीविरुद्ध धडकला आंबेडकरी जनतेचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा, तरूणाईने दिला थेट इशारा


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीतील (पीईएस) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपच्या घुसखोरीविरुद्ध आज हजारो आंबेडकरी जनतेचा सहभाग असलेला मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. या मोर्चातील महिलांचा लक्षणीय सहभाग आणि आंबेडकरी तरूणाईच्या सळसळत्या उत्साहाने बाबासाहेबांच्या पीईएसकडे वाकड्या नजरेने पहाल तर याद राखा, असा इशाराच घुसखोरी करू इच्छिणाऱ्या आरएसएस-भाजपला दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४५ मध्ये स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळावर संस्थेचे कथित अध्यक्ष डॉ. एस.पी. गायकवाड यांनी आरएसएस-भाजपचे कट्टर पाईक असलेले माजी आमदार श्रीकांत जोशी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार, डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्यासह सहा जणांची मनमानी पद्धतीने वर्णी लावली आहे. न्यूजटाऊनने १३ ऑगस्ट २०२३ रोजी ‘बाबासाहेबांच्या पीईएसमध्ये संघाचा ‘ऍनाकोंडा’, संस्थेच्या सदस्यपदी दोन भाजप समर्थकांची वर्णी, ‘महाउपासक’ गायकवाडांकडून ‘रेशीमबागे’ची उपासना!’ या शिर्षकाखाली याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आंबेडकरी जनतेत संतापाची लाट निर्माण झाली.

आवश्य वाचाः बाबासाहेबांच्या पीईएसमध्ये संघाचा ‘ऍनाकोंडा’, संस्थेच्या सदस्यपदी दोन भाजप समर्थकांची वर्णी, ‘महाउपासक’ गायकवाडांकडून ‘रेशीमबागे’ची उपासना!

बाबासाहेबांच्या पीईएसमध्ये संघाच्या ऍनाकोंडाची घुसखोरी रोखण्यासाठी आंबेडकरी समाज एकवटला. बैठकांचे सत्र सुरू झाले आणि त्यातून बाबासाहेबांची पीईएस वाचवण्यासाठी विभागीय आयुक्तालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या महिनाभरापासून आंबेडकरी तरूण या मोर्चाची तयारी करत होते. त्यानुसार आज (१३ सप्टेंबर २०२३) हजारो आंबेडकरी जनतेचा सहभाग असलेला मोर्चा नागसेनवनातील मिलिंद महाविद्यालयातून निघून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.

बाबासाहेबांच्या संस्थेला आम्ही हात कसा लावावा हा भावनिक मुद्दा पुढे करून राज्य सरकार दिशाभूल करत आहे. ही दिशाभूल बाबासाहेबांची संस्था बरबाद करण्याचा दुष्ट कावा आहे. संस्थेच्या विश्वस्त मंडळातील काही शारीरिक व मानसिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींच्या आडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील नैतिक, बौद्धीक व सामाजिक लोकशाही वृद्धींगत करण्यासाठी निर्माण केलेल्या या संस्थेला मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे, असे मोर्चेकऱ्यांनी म्हटले आहे.

 शासन व प्रशासनातील तसेच सत्ताधारी भाजप पक्षाच्या काही हस्तकांना ही संस्था उद्धवस्त करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या विश्वस्त मंडळावर बळजबरीने घुसवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. तो कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच आज मोर्चेकऱ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपालांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

बाबासाहेबांची पीईएस एक महिन्यांच्या वादमुक्त करण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना देण्यात यावेत. अन्यथा पीईएसचे आजी-माजी विद्यार्थी, हितचिंतक व समस्त आंबेडकरी समुदायाच्या वतीने मुंबईत राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

आज निघालेल्या या मोर्चात ३ बाय ३० फूट आकाराचे बाबासाहेबांचे संदेश असलेले ८ बॅनर मोर्चेकऱ्यांना देण्यात आले होते. त्यामुळे मोर्चाची शिस्त शेवटपर्यंत कायम राहिली. समता सैनिक दलाने मानवंदना दिल्यानंतर मोर्चा सुरू करण्यात आला. हा मोर्चा मिल कॉर्नरवर आल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांना समता सैनिक दलाने अभिवादन केले.

मोर्चा भडकलगेट येथे पोहोचल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महिलांनी अभिवादन केले तर अण्णाभाऊ साठे यांना कलावंतांनी अभिवादन केले भडकलगेट येथे मोर्चेकऱ्यांसाठी भीमसैनिकांनी स्वयंस्फूर्तीने पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली होती.

बाबासाहेब आंबेडकरांचा १० फूट उंचीचा पुतळा व बाबासाहेबांच्या संदेशाचे फलक असलेला भीमरथ मोर्चाच्या अग्रभागी होता. मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुल येथे सुमारे ८ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळ्या करण्यात येऊन निवेदनात जोडण्यात आले. एक हजार निळे झेंडे, ७०० विविध मागण्याचे फलक व १०० ‘सेव्ह पीईएस’ लिहलेले निळे ध्वज घेऊन लोक मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात महिला व विद्यार्थ्यांची व आबालवृद्धांची लक्षणीय उपस्थिती होती.

मोर्चा विभागीय आयुक्तालयावर पोहोचल्यानंतर पाच जणांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. विभागीय आयुक्तांनी सर्व संबंधित विभागांना निवेदन पाठवून अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले. या मोर्चात सुमारे ८ ते १० हजार लोक सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध व संयमाने  आंबेडकरी समुदायाचा हा मोर्चा पार पडला.

मोर्चा निघण्यापूर्वी मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल येथे मोर्चेकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या

  • मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेली संस्थेच्या कार्यकारी मंडळाची प्रकरणे तीन महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावीत.
  • औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मालकी हक्काच्या जमिनीवर भूमाफियांनी केलेले अतिक्रमण तत्काळ काढण्यात येऊन संबंधितांवर फौजदारी खटले दाखल करण्यात यावे.
  • पीईएस संस्थेच्या मालकी हक्काची जमीन औरंगाबाद शहरात आहे. तिच्या चतुःसीमा, हद्द, खुणा यांची शासकीय मोजणी करण्यात यावी.
  • संस्थेच्या अंतर्गत वादामुळे संस्थेमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरती झाली नसल्यामुळे विशेष बाब म्हणून शासनाने भरतीचे आदेश जारी करावेत.
  • पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे वेतनेत्तर अनुदान तत्काळ देण्यात यावे.
  • पीईएसच्या शाळा-महाविद्यालयांचे बिल्डिंग फंड विनाविलंब देण्यात यावेत.
  • मिल कॉर्नर ते मिलिंद चौक, मिलिंद चौक ते विद्यापीठ गेट, पानचक्की ते डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज या मार्गासाठी संस्थेच्या अधिग्रहित केलेल्या जागेच्या मोबदल्यात डीएमआयसीतील शैक्षणिक उद्देशासाठी राखीव १०० एकर भूखंड संस्थेला देण्यात यावा.
  • सामाजिक न्याय विभागाच्या विशेष गटक योजनेअंतर्गत स्वतंत्र हेड निर्माण करून पीईएसच्या वसतिगृहांसाठी निधी देण्यात यावा.
  • पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयात डॉ. एस.पी. गायकवाड व सर्व संबंधितांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

प्रस्थापित नेत्यांनी फिरवली मोर्चाकडे पाठ!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा राजकीय व सामाजिक वारसा सांगत राजकारण करणाऱ्या आणि त्याच वारश्याच्या बळावर गब्बर बनलेल्या औरंगाबादेतील आंबेडकरी चळवळीतील प्रस्थापित नेत्यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पीईएस ही संस्था आरएसएस-भाजपच्या घश्यात घालण्याचे कटकारस्थान उलथवून टाकण्यासाठी सर्वसामान्य आंबेडकरी जनता स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरली असताना मात्र या संस्थेचे आपणही काही देणे लागतो, ही भावना औरंगाबादेतील प्रस्थापित आंबेडकरी नेत्यांत का आली नाही आणि ते मोर्चात का सहभागी झाले नाहीत? अशी चर्चा मोर्चेकरी करताना दिसत होते.

आजच्या मोर्चात झालेल्या गर्दीने तुमच्या शिवाय आम्ही बाबासाहेबांची पीईएस वाचवण्यासाठी समर्थ आहोत, असा इशाराच जणू प्रस्थापित आंबेडकरी नेत्यांना दिला आहे. प्रस्थापित आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवल्याचे सर्वसामान्य आंबेडकरी समुदायाच्या ठळकपणे लक्षात आल्यामुळे आगामी काळात हीच आंबेडकरी जनता त्यांना जाब विचारण्याची शक्यताही काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!