‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री शिंदे म्हणालेः ते कृत्य खोडसाळपणाचे, मराठा आरक्षणाबाबत सरकार संवेदनशीलच!


मुंबईः मराठा आरक्षणप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओच्या निमित्ताने या तिघांनाही सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ‘आपणाला काय बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं…’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताना ऐकू येत असलेल्या या व्हिडीओबाबत आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडीओ खोडसाळपणा असून मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरूवातीपासूनच संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसल्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला सुरूवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याबाबत आता मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

‘मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे’, असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

‘आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे,  असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

काय आहे ‘त्या’ व्हायरल व्हिडीओत?

मराठा आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेला सुरूवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओतील संवाद असा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेः ‘…नाही आपण बोलून मोकळं तर व्हायचं ना..बोलून मोकळं बोलायचं अन् निघून जायचं, हाय ना’

उपमुख्यमंत्री अजित पवारः ‘हो… येस’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसः ‘माईक चालू आहे…’

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या तिघांनाही ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे मंगळवारीच संभाजी भिडे यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवाडी करणार नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमची फसवणूक करणार नाहीत, अजित पवार काळीज असलेला माणूस आहे, असे मनोज जरांगे पाटील यांना सांगितले होते. भिडेंच्या या वक्तव्याचा संदर्भ देऊन या तिघांवरही टीका केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!