चंद्रकांत पाटलांना रयत शिक्षण संस्थेनेही सुनावले खडे बोल, वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध!

साताराः महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील  यांच्याविरोधात राज्यभर संतापाची लाट आली असून विविध स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असतानाच आता कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेनेही प्रसिद्धी पत्रक जारी करून चंद्रकांत पाटलांना खडे बोल सुनावत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. रयत शिक्षण संस्थेची ही प्रेसनोट जशीच्या तशी देत आहोत…

“महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोर-गरीब, डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १०३ वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

हेही वाचाः फुले-आंबेडकरांनी भीक मागितली आणि शाळा चालवल्या: उच्च शिक्षणमंत्री चंद्रकात पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य, पहा व्हिडीओ

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे ही कर्मवीरांची दूरदृष्टी होती. म्हणून त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. किर्लोस्कर, ओगले, कूपर या कंपनीमध्ये कर्मवीरांनी जे काम केले त्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातील उत्पन्न, किर्लोस्कर कंपनीतील अण्णांचे शेअर्स, आई-वडिलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले १०० तोळे सोने, मंगळसूत्रसुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले.

हेही वाचाः चंद्रकांत पाटलांवर शाई फेकून केले तोंड काळे, पिंपरी चिंचवडमधील घटना; पहा व्हिडीओ

विद्यार्थ्यांनी भीक मागून शिकण्यापेक्षा स्वावलंबनाने, स्वकष्टाने आपले शिक्षण पूर्ण करावे हे कर्मवीरांचे शैक्षणिक तत्वज्ञान होते. यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका’ ही अभिनव योजना राबवली. आज या योजनेला जागतिकस्तरावर मान्यता मिळाली आहे. म्हणूनच ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे कर्मवीरांनी संस्थेचे ब्रीद घेतले.

हेही वाचाः चंद्रकांत पाटलांचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांची औरंगाबादेत धरपकड, राज्यभरात संतापाची लाट

कर्मवीरांच्या या कार्याला समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लोकसहभागातून ही शैक्षणिक चळवळ अधिकाधिक व्यापक केली. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी समाजाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या माध्यमातून कोट्यवधी मुलांना शिक्षण मिळाले. आज महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर दिसतो आहे. त्याला अण्णांचे स्वावलंबी शिक्षणाचे हे तत्वच कारणीभूत आहे, असे म्हटले तर अनुचित ठरणार नाही.

राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज हे कर्मवीरांचे आदर्श होते. याच कालखंडात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेसुद्धा कर्मवीरांना मोठे सहकार्य लाभले. म्हणून ज्ञानाने समृद्ध असलेली पिढी कर्मवीर निर्माण करू शकले. या सर्व पार्श्वभूमीवर ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काल केलेले विधान अत्यंत दुर्देवी आहे. त्याचा संस्थेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.”
-रयत शिक्षण संस्था, सातारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!