चंद्रकांत पाटलांचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांची औरंगाबादेत धरपकड, राज्यभरात संतापाची लाट

औरंगाबादः महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळत असून त्यांचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांची औरंगाबादेत धरपकड करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित पैठण येथील संतपीठाच्या पहिल्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात बोलताना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांनी दिलेल्या योगदानाची तुलना थेट भीक मागण्याशी केली. तुम्ही अनुदानावर अवलंबून का रहाता? या देशामध्ये शाळा कुणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली,  असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रभर निषेध व्यक्त केला जात आहे. औरंगाबादेतही त्यांना निषेधाला सामोरे जावे लागले. वंदे मारतम सभागृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून चंद्रकांत पाटील हे सरस्वती भुवन महाविद्यालयात उद्योजक आणि प्राध्यापकांशी चर्चा करण्यासाठी पोहोचले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी येथे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करून ताब्यात घेतले.

हा कार्यक्रम आटोपून चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देण्यासाठी जाणार होते. तेथे आंबेडकरी चळवळीतील कर्यकर्ते आधीच पोहोचले होते. पोलिसांना याची खबर महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयातूनच देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तेथे जमलेल्या विजय वाहुळ आणि इतर कार्यकर्त्यांना अटकाव केला आणि त्यांना प्रतिबंधात्मक अटक करून वेदांतनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

काय म्हणाले नेमके चंद्रकांत पाटील?: फुले-आंबेडकरांनी भीक मागितली आणि शाळा चालवल्या: उच्च शिक्षणमंत्री चंद्रकात पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य, पहा व्हिडीओ

गेल्या काही दिवासांपासून महाराष्ट्रातील भाजप नेते महापुरूषांबद्दल अपमानास्पद विधाने करत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आधीच वाद निर्माण झाला आहे. त्यात आज चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे.

कोण काय म्हणाले?:

हा जाणून बुजून अपमानचः राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांचे फुले-आंबेडकरांनी भीक मागून शाळा उभारल्या हे विधान चुकीचे तर आहेच पण महापुरूषांच्या रचनात्मक कार्याच्या उभारणीला भीक मागण्याची उपमा देणे हा त्यांचा जाणूनबुजून केलेला अपमानच आहे. चंद्रकांत पाटील यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर भाजपचे लोक आता जाणून बुजून महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत.

जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

जनताच सत्तेचा माज उतरवेलः भाजपच्या चंद्रकांत पाटलांना लोकवर्गणी आणी भीक यातील फरक तरी कळतो का?  भाजपचे नेते एवढे निर्ढावले आहेत की साधी माफी मागण्याचे सौजन्यही या लोकांकडे नाही. हा सत्तेचा माज असून हा माज जास्त काळ टिकणार नसतो. ज्या जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवले, तीच जनता तुमचा माज उतरवेल, हे चंद्रकांत पाटील त्यांच्या पक्षाने लक्षात ठेवावे.

नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

वाचाळवीरांकडून हा महापुरूषांचा अपमानचः भाजपमध्ये वाचाळवीर आहेत, हे चंद्रकात पाटलांनी परत दाखवून दिले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून शाळा उभारल्या. स्वतःजवळील पैसेही या महापुरुषांनी शाळांसाठी खर्च केले. त्यांनी भीक नाही मागितली. भीक म्हणून तीनही महापुरुषांचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार

भाजपमध्ये महापुरूषांचा अपमान करण्याची स्पर्धाचः महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून महापुरूषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झालेली आहे, असेच वाटत आहे. एकापाठोपाठ एक महापुरूषांची बदनामी करणारे वक्तव्ये येत आहेत. अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील. चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध!

जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते.

 चंद्रकांत पाटील म्हणतात… राज्यभर होत असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. भीक म्हणजे काय आताच्या भाषेत सीएसआर, वर्गणी, देणग्या म्हणूयात. आता या प्रत्येक गोष्टीला असा शेंडा नाही, बुडका नाही. वाद निर्माण करण्यासाठी सुरू आहे. जे कोणी ही क्लिप पाहतात, एकतात ते लगेचच म्हणतात की अरे या ( टीका करणाऱ्यांचे) लोकांचे काय चाललेय?, असे पाटील म्हणाले. एका अर्थाने चंद्रकांत पाटील आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचेच संकेत दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!