फुले-आंबेडकरांनी भीक मागितली आणि शाळा चालवल्या: उच्च शिक्षणमंत्री चंद्रकात पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य, पहा व्हिडीओ


औरंगाबाद: या देशात महात्मा फुले, कर्मवारी भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांकडे भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त वक्तव्य उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करून त्यांचा अपमान करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. आता वंचित समाजघटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रतिकुल परिस्थितीत शाळा-महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू करणाऱ्या महापुरूषांना चंद्रकांत पाटलांनी या वक्तव्यातून भिकारी ठरवण्याचा प्रयत्न प्रयत्न केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

तुम्ही अनुदानावर का अवलंबून राहता? असा सवाल करतानाच तुम्हीही भीक मागा आणि शाळा चालवा, असा अप्रत्यक्ष सल्लाच त्यांनी राज्यातील संस्थाचालकांना देऊन टाकला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित पैठण येथील संतपीठाचा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षस्थानी होते. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे रोहयो व फलोत्पादन मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, संतपीठाचे समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, तुम्ही अनुदानावर अवलंबून का रहाता? या देशामध्ये शाळा कुणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली.

शाळा सुरू करायच्या आहेत, आम्हाला पैसे द्या. त्याकाळी दहृदहा रुपये द्यायचे. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. एका अर्थाने चंद्रकांत पाटील यांनी अनुदानाची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थाचालकांनाही अनुदानावर नव्हे तर भीक मागूनच शाळा चालवा, असा अप्रत्यक्ष सल्लाच देऊन टाकला आहे.

औरंगाबादेतच काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘शिवाजी तो पुराने जमाने की बात है,’ असे वादग्रस्ता वक्तव्य केले होते. त्यापूर्वी त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून निर्माण झालेला वाद अजून शमलेला नाही. राज्यपाल हटावच्या मागणीसाठी १७ डिसेंबरला महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याची त्यात भर पडली आहे.

भीक मागून नव्हे, लोकवर्गणीतून चालवल्या शाळा

चंद्रकांत पाटील म्हणतात त्याप्रमाणे भीक मागून नव्हे तर महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणीतून शाळा-महाविद्यालये सुरू केली आणि ती यशस्वीपणे चालवलीही. तसे ऐतिहासिक संदर्भही सापडतात. समाजातील वंचित, दुर्बल घटकांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी आणि हा समाज ज्ञान संपन्न व्हावा, हा त्यामागचा हेतू होता. पुरेसा पैसा उपलब्ध नसल्यामुळे या महापुरूषांनी लोकांना आवाहन करून लोकवर्गणी गोळा केली आणि त्यातून शाळा, महाविद्यालये व वसतिगृहे चालवली. लोकवर्गणी गोळा करणे आणि भीक मागणे या दोन भिन्न गोष्टी असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांने लोकवर्गणी गोळा करणे म्हणजे भीक मागणे असा अर्थ काढल्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!