मुंबईः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. २७ आणि २८ जून रोजी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.
मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात वरूणराजाने दमदार हजेरी लावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे लांबलेला पाऊस महाराष्ट्रभर सक्रीय झाला आहे. नैऋत्य मान्सूनची प्रदीर्घकाळानंतर वेगवान प्रगती होत आहे. मान्सून आता अधिकाधिक क्षेत्र व्यापत चालला आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी पावसाचा जोर वाढला आहे. या स्थितीमुळे येत्या २४ ते ४८ तासांत मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२७ आणि २८ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. २९ आणि ३० जून रोजीही काहीशी अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळे पावसाचा जोर वाढल्यामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. २७ जून रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या शिवाय उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
२८ जून रोजी पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहील. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. याही दिवशी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.